कोल्हापूर : पुणे - बंगळूर महामार्गावर कणेरीवाडी (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपाजवळ 5 कोटी 24 लाख 90 हजार रुपये किमतीची 5 किलो 249 ग्रॅम व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच पलायन करणार्या मुख्य संशयितासह तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तस्करीत गुंतलेल्या मालवण येथील रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
मुख्य संशयित संभाजी श्रीपती पाटील (78, रा. चंद्रे, ता. राधानगरी), प्रमोद ऊर्फ पिंटू शिवाजी देसाई (48, चिक्कल वहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), अनिल तुकाराम महाडिक (55, मुगळी, ता. गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली मोटार व मोपेड हस्तगत करण्यात आली आहे.
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत आणखी काही साथीदारांची नावे पुढे येत आहेत. कोकण पट्ट्यातील सराईत गुन्हेगारही तस्करीत सक्रिय असल्याचे समजते. संबंधितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. चालू वर्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचेही ते म्हणाले.
खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव यांच्यासह पथकाने कणेरीवाडीजवळील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. मोटारीतून दोन अनोळखी व्यक्ती पेट्रोल पंप परिसरात आल्या. पाठीला सॅक लावलेली एक व्यक्ती मोपेडवरून आली. पोलिसांची चाहूल लागताच तिघेही वाहनातून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. झडतीत सॅकमध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली.
मुख्य संशयित संभाजी पाटीलसह तिघांकडे सखोल चौकशी करण्यात आली. संभाजी पाटील याने व्हेल माशाची उलटी मालवण येथून विक्रीसाठी कोल्हापुरात आणल्याचे निष्पन्न झाले. प्रमोद ऊर्फ पिंटू देसाई आणि अनिल महाडिक हे दोघेजण उलटी खरेदीसाठी आल्याची माहिती समोर आली आहे. संशयितावर यापुर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याची पोलिस माहिती घेत आहेत.