कोल्हापूर : जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन करणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. जलसंपदाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाची ५६ हजार एकर जमीन जलसंपदाने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला प्राधान्य देणार आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणाच्याच ठिकाणी कार्यरत राहतील यासाठी संबंधित कार्यालय धरणाच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, काळम्मावाडी धरणाच्या दोन्ही कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता द्यावी. कोल्हापूर शहरातील ब्ल्यू व रेड लाईनबाबत ठोस निर्णय घ्यावा. अलमट्टी धरणाच्या अनुषंगाने सातत्याने भेडसावणार्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जलसंपदाने सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा करण्याची सूचना केली. खा.धनंजय महाडिक म्हणाले, जिल्ह्यात सूक्ष्म प्रकल्पांची गरज असून त्याची उभारणी करावी. शेतकऱ्यांमध्ये पाणी वापराबाबत जनजागृतीची करावी. अलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढू नये यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत धुमाळ यांचेही भाषण झाले. मुख्य अभियंता अलका अहिरराव यांनी प्रस्ताविक केले. अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ.राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, आमदार चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूरशी भावनिक असले तरी ते नाते नाही!
कोल्हापूरशी भावनिक नाते असले तरी त्या काळात कॉलेजला मुली नसल्याने ते नाते नसल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.