राशिवडे : राधानगरी तालुक्यातील राधानगरी, काळम्मावाडी आणि तुळशी धरणक्षेत्रामध्ये धुवाँधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात 3100 क्यूसेक, तर तुळशी धरणातून नदीपात्रात 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी धरणातून सोळाशे क्यूसेक विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. भोगावती, तुळशी नदीमध्ये दोन्ही धरणांतून 3500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.
काळम्मावाडी वगळता राधानगरी, तुळशी धरणांमध्ये 54 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. दि. 1 ते दि. 20 जून या 20 दिवसांच्यादरम्यान राधानगरी धरणक्षेत्रामध्ये 638 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, सध्या धरणामध्ये 60 टक्के पाणीसाठा आहे. या धरणातून 3100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू केला आहे. काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये वीस दिवसांमध्ये 597 मि.मी. पाऊस झाला असून गेल्या चोवीस तासांमध्ये 111 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तुळशी धरणक्षेत्रामध्ये वीस दिवसांमध्ये 410 मि.मी. पावसाची नोंद झाली असून धरण 54 टक्के भरल्याने तीनशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग तुळशी नदीपात्रात करण्यात आला आहे.
प्रामुख्याने पावसाच्या पाण्याची धरणामध्ये होणारी आवक व संभाव्य पाऊस यांचा अंदाज घेत धरणातून पाणी विसर्ग वाढविण्यात येत आहे.