Municipal Corporation | पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला विहिरी अन्‌ कूपनलिकांची आठवण! 
कोल्हापूर

Municipal Corporation | पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला विहिरी अन्‌ कूपनलिकांची आठवण!

शहरातील १२ विहिरी, ५५० कूपनलिका दुरुस्तीच्या हालचाली; गळती रोखण्याचे आव्हान कायम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी बचतीसह पर्यायी स्रोतांचा वापर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील १२ विहिरी आणि सुमारे ५५० कूपनलिकांची महापालिकेला आठवण झाली असून त्यांची दुरुस्ती, विहिरींची स्वच्छता तसेच नादुरुस्त कूपनलिकांवर हँडपंप आणि विद्युतपंप बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

सध्या पाणीपुरवठ्यावर १० टक्के कपातीचा निर्णय लागू करण्यात आला असला, तरी आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने कपात वाढवून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पर्यायी जलस्रोतांचा वापर करून पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे, तर शिंगणापूर आणि बालिंगा योजनांमधून पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या तिन्ही स्रोतांतून दररोज सुमारे २१० एमएलडी पाणी उपसा केला जातो. संभाव्य कपातीमुळे हा उपसा १५० एमएलडीपर्यंत मर्यादित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विहिरी आणि कूपनलिकांचा पर्यायी वापर महत्त्वाचा ठरणार आहे.

गळती रोखल्यास मोठी बचत शक्य

शहरातील विविध जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याची तक्रार आहे. एकीकडे पाणी कपातीचे नियोजन सुरू असताना, दुसरीकडे गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पर्यायी स्रोत कार्यान्वित करण्याबरोबरच जलवाहिन्यांमधील गळती रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. विहिरी-कूपनलिकांच्या दुरुस्तीला गळती रोखण्याची जोड मिळाल्यास संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

दहा टक्के पाणी कपात सुरू

कोल्हापूर शहरात शनिवार (दि. १७) पासून १० टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली. दररोज २०० एमएलडी पाण्याचा उपसा होत होता. मात्र, शनिवारी १८० एमएलडी पाणी उपसा करून शहराला पुरवठा करण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेतून १५० एमएलडी, तर बालिंगा उपसा केंद्रातून ३० एमएलडी पाण्याचा उपसा झाला. दिवाळीपर्यंत ही पाणी कपात राहणार आहे. राज्यात दुष्काळ असल्याने शासनाने १० टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या वतीने त्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. कोल्हापूरला काळम्मावाडी आणि राधानगरी धरणांतून पाणीपुरवठा होताे. धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. परंतु, जून २०२७ पर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परिणामी, दिवाळीनंतर कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT