कोल्हापूर; सेंट्रल डेस्क : महाराष्ट्रात ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईच्या संभाव्य शक्यतेमुळे शेतकरी कमी दरात पशुधन विकत आहेत. काही ठिकाणी दोन महिने, तर कुठे महिनाभर पुरेल इतकाच हिरवा चारा उपलब्ध असल्याने शेतकरी आतापासूनच गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या विकत असल्याचे चित्र आहे. चारा टंचाईच्या शक्यतेने पशुधनाचे दर २५ टक्क्यांनी घसरले आहेत.
महाराष्ट्रात ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्यात ७६ तालुक्यांमध्ये कमी पाऊस आणि दीर्घ कोरड्या कालावधीमुळे चारा व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची शक्यता कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. जालना आणि बीडमध्ये उपलब्ध चारा सुमारे ६५ दिवसांचा असल्याचे कृषी क्षेत्रातील अहवालात नमूद आहे. चारा म्हणून उसाचा वापर करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जालन्यात हिरवा चारा दोन महिन्यांत संपण्याची शक्यता असून, चारा-पाण्याच्या अडचणीमुळे शेतकरी जनावरे बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
परभणीत ४,८२,९९१ पशुधनासाठी उपलब्ध चारा सुमारे ११४ दिवस पुरेल, असा पशुसंवर्धन विभागाचा अंदाज आहे. उपलब्ध व संभाव्य स्रोतांमधून सुमारे २.६ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. बीडमध्ये ८.५५ लाखांहून अधिक जनावरांसाठी सुमारे १०० दिवसांचा चारा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालावर आधारित वृत्तात म्हटले आहे. काही तालुक्यांत हा साठा केवळ २१ ते ७६ दिवसांचा आहे. नांदेड आणि लातूरमध्ये चारा बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिरवा-सुका चारा, गवत आणि पशुखाद्याची जिल्ह्याबाहेर विक्री/वाहतूक रोखण्याचा निर्णय टंचाईच्या शक्यतेमुळे घेण्यात आला. सोलापुरातही चारा-सायलेज बाहेर विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तेथील उपलब्ध चारा सुमारे १२० दिवस पुरेल, असा आढावा आहे.
जनावरांच्या किमतीत २५% घसरण
राज्य सरकारने वैरण विकास धोरण जाहीर केले असून, जिल्हानिहाय चारा उत्पादन, गायरान/पडीक जमिनीवर चारा लागवड, सुधारित चारा पिके आणि इतर स्रोतांचा वापर यावर भर देण्यात आला आहे. ३० सप्टेंबरच्या एका अहवालानुसार दुष्काळामुळे जनावरांच्या विक्रीत वाढ झाली असून, काही बाजारांमध्ये किमती २०-२५ टक्क्यांनी घसरल्याचे नमूद करण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पशुधन विक्री वाढल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.
जालना : हिरवा चारा २ महिने पुरेल; पशुधन विक्रीत वाढ
बीड : ८.५५ लाख पशुधन; १०० दिवसांचा चारा उपलब्ध
परभणी : ४.८३ लाख पशुधन; ११४ दिवसांचा चारा
नांदेड : चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी
लातूर : हिरवा-सुका चारा व पशुखाद्य बाहेर नेण्यावर निर्बंध
सोलापूर : १२० दिवसांचा चारा उपलब्ध; बाहेर विक्री/वाहतूक बंदी
विदर्भ : २७% पर्जन्यतूट; दुष्काळाचा पशुधनावर परिणाम शक्य