आमदार डॉ. विनय कोरे  Pudhari File Photo
कोल्हापूर

वारणा दूध संघ शेतकरी, कामगारांना देणार 91 कोटी

आ. विनय कोरे यांची घोषणा; 9 रोजी रक्कम खात्यावर वर्ग होणार

पुढारी वृत्तसेवा

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध संघामार्फत दिवाळीसाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांना फरक बिल, कामगारांना पगार व बोनस अशी तब्बल 91 कोटी रुपयांची रक्कम देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

वारणा दूध संघाने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर 2 रुपये 55 पैसे व गाय दुधासाठी 1 रुपये 55 पैसे इतका विक्रमी फरक बिल देण्याचे जाहीर केले. विक्रमी फरक बिल देणारा वारणा दूध संघ हा महाराष्ट्रातील एकमेव असल्याचे अध्यक्ष डॉ. कोरे यांनी सांगितले. फरक बिलाची व बोनसची रक्कम 9 ऑक्टोबर रोजी दूध संस्था तसेच कर्मचार्‍यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.

डॉ. कोरे म्हणाले, वारणा दूध संघाने शेतकर्‍यांसाठी अमृत पशुधन सुरक्षा कवच योजना सुरू करून या योजनेद्वारे आतापर्यंत सुमारे 2 कोटी 43 लाख रुपयांचा लाभही उत्पादकांना दिला आहे. आता हा विमा 500 रुपयांत 1 लाख रुपयांचा केला असून उत्पादकांना पशुवैद्यकीय सेवा माफक दरात देऊन विविध अनुदानपर योजना राबविल्याचे सांगितले.

संघाने नुकतीच म्हैस खरेदीसाठी 70 हजार रुपयांचे अनुदान देणारी योजना जाहीर केली असून, या योजनेस शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगून वारणा दूध संघ संलग्न असणार्‍या तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व डॉ. आर. ए. पाटील पतसंस्था, वारणा डेरी अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या सर्व संस्थांच्या कर्मचार्‍यांना बोनस देण्यात येणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव व कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस् मॅनेजर प्रवीण शेलार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT