वारणानगर : वारणा सहकारी दूध संघाच्या ५८ व्या वार्षिक सभेत बोलताना वारणा समूहाचे प्रमुख आ. डॉ. विनय कोरे. समोर सभासद. 
कोल्हापूर

Dr. Vinay Kore | ‘वारणा’च्या सव्वालाख दूध उत्पादकांना ‘अमृतबंध’चे ५० रुपयांत सभासदत्व

आ. डॉ विनय कोरे यांची घोषणा : वारणा दूध संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

पुढारी वृत्तसेवा

वारणानगर : वारणा दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व एक लाख १७ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ ५० रुपयांचे सभासदत्व देऊन एकत्र कुटुंबाप्रमाणे विश्वासाने ’वारणा अमृतबंध’ योजनेत बांधून वर्षातून तीनवेळा दोन किलो श्रीखंड देण्याचा प्रारंभ तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीपासून करणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली.

वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी खेळीमेळीत झाली. या सभेत कोरे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एच. आर. जाधव, उपाध्यक्ष डॉ. एन. आर. पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. याप्रसंगी सर्वोच्च दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला.

आ. डॉ. कोरे म्हणाले, वारणा दूध संघाची अहवाल सालात १५४२ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली असून ती गतवर्षीपेक्षा २७१ कोटींनी जादा आहे. निव्वळ नफा ८० कोटी आहे. मागणी वाढल्याने प्रतिदिन दहा टन पनीर निर्मितीचा प्रकल्प लवकरच उभारणार असून २० टनचे दही, आईस्क्रीम व फ्लेवर मिल्क प्रक्रियेचे जादा क्षमतेचे अद्ययावत प्रकल्प नुकतेच सुरू केले आहेत. हैदराबाद शहरात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची सुरुवात केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगून ‘वारणा’ला सहकाराच्या धाग्यात घट्ट गुंतवून विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अध्यक्ष एच. आर. जाधव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला; तर संचालक अभिजित पाटील यांनी डॉ. विनय कोरे यांना सहकारभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. संस्थेचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी विषयवाचन केले. सभासदांनी सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजूर केले. याप्रसंगी वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, लेखापरीक्षक रणजित शिंदे, जीएसटी सल्लागार अमर पाटील, सर्व संचालक, सभासद, पदाधिकारी उपस्थित होते. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.

तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव

‘अन्न व भेसळ’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोगस व भेसळयुक्त दुध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादने करणाऱ्यांना चाप लावल्याने ग्राहकांना निर्भेळ दूध मिळत आहे. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव डॉ. कोरे यांनी मांडला व तो सर्वानुमते मंजूर केला.

जिल्हा दूध संघाची निवडणूक... सहा महिने चर्चा...

जिल्हा दूध संघाची निवडणूक कशी सुरू आहेत बघा... जिल्ह्यातील वर्तमानपत्रे गेली सहा महिने या विषयावर चर्चा करत आहेत. यावर मी बोलणे योग्य वाटत नाही... मात्र वारणाने वेगळेपण जपून वारणा दूध संघाची निवडणूक सलग आठ वेळा बिनविरोध झाली. एवढा विश्वास सभासदांनी व्यक्त केल्याचे आ. डॉ. कोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT