Warna Industrial Group | दिवाळी सणासाठी वारणा उद्योग समूहाकडून शेतकऱ्यांना १२५ कोटी File Photo
कोल्हापूर

Warna Industrial Group | दिवाळी सणासाठी वारणा उद्योग समूहाकडून शेतकऱ्यांना १२५ कोटी

वारणा साखर कारखान्याकडून प्रतिटन ११९ रुपये गतवर्षीचे ऊस बिल

पुढारी वृत्तसेवा

वारणानगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वारणा साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना प्रतिटन ११९ रुपये ऊस बिल, वारणा दूध संघामार्फत म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे, तर गाय दुधासाठी प्रतिलिटर १ रुपये ४५ फरक बिल आणि समूहातील कर्मचाऱ्यांना बक्षीस, बोनस अशी सुमारे १२५ कोटी रुपयांची रक्कम ऊस, दूध उत्पादक-शेतकरी, कामगार यांच्या खात्यावर सोमवारी जमा केल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. आ. विनय कोरे यांनी दिली.

तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या गतवर्षीच्या गळीत हंगामातील एफआरपीपेक्षा अधिकची प्रतिटन ११९ रुपये रक्कम तसेच सर्व कर्मचाऱ्यांना पगार व बोनस, दूध संघाचे फरक बिल, दूध बिल याबरोबरच वारणा साखर कारखाना, वारणा दूध संघ, अमृत सेवक संस्था, सावित्री महिला संस्था, तात्यासाहेब कोरे वाहतूक संस्था, वारणा डेअरी ॲग्रो या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना पगार, बोनस अदा करण्यात आला आहे.

वारणा दूध संघामार्फत सभासद, कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात तूप, भेटवस्तू, खरेदी कुपन्स वाटप करण्यात आले. शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून सहकार, कृषी, दुग्ध व्यवसाय, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत वारणा उद्योग समूहाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची परंपरा कायम जपली आहे.

तात्यासाहेब कोरे साखर कारखाना, वारणा दूध संघ प्रमुख संस्थांसह संस्थेच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सुमारे १२५ कोटी रुपयांच्या वितरणाला दुष्काळसदृश्य परिस्थितीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दिवाळीच्या निमित्ताने १२५ कोटी रुपयांचे वितरण झाल्याने शेतकरी आणि कामगारवर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून आनंद, आपुलकी आणि समृद्धीचा संदेश देणारी आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारी ठरणार असत्याचे डॉ. आ. कोरे यांनी सांगितले.

यावेळी वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत, दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वारणा उद्योग समूहाची वाटचाल विकासाला पूरक

वारणा उद्योग समूहाची वाटचाल ही केवळ औद्योगिक प्रगतीपुरती मर्यादित नसून शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला पूरक अशी आहे. परस्पर सहकार्य, कष्टाचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांच्या आधारावर समूहाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT