कोल्हापूर बाजार समिती  (Pudhari Photo)
कोल्हापूर

kolhapur | खासदार महाडिकांचेही नाव घ्‍या.., पुढे बोला.. पुढे बोला..

खा. महाडिक, आ. पाटील गटाच्‍या संचालकांत कलगीतुरा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या सभापती निवडीनंतर नूतन सभापती प्रा. शेखर देसाई भाषण करत असताना त्‍यांनी सर्व नेत्‍यांची नावे घेतली. यावेळी विरोधी गटाचे संचालक नंदकुमार वळंजू यांनी आमचे नेते खासदार धनंजय महाडिक यांचेदेखील नाव घ्‍या, अशी हाक दिली.

यावर आ. सतेज पाटील गटाचे संचालक सुयोग वाडकर यांनी, पुढे बोला.. पुढे बोला.. असे सभापतींना सांगितले. यावर सभापती प्रा. देसाई यांनीदेखील काही सेकंद थांबत खा. महाडिक यांचे नाव घेण्‍याचे टाळत पुढे बोलण्‍यास सुरुवात केली. सभापती निवडीच्‍या बैठकीनंतर संचालक वळंजू यांनी आमच्‍या नेत्‍याचे नाव घेतले नाही, असे म्‍हणत नूतन सभापतींसमोर नाराजी व्‍यक्‍त केली.

बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी समितीच्‍या शेतकरी भवनमध्‍ये संचालक मंडळाची बैठक झाली. निवडीनंतर बैठकीत झालेल्‍या संचालकांच्‍या भाषणात राजकीय टोलेबाजी रंगली. विशेषतः खा. महाडिक व आ. पाटील गटाच्‍या संचालकांमध्‍ये रंगलेला कलगीतुरा चर्चेचा ठरला. संचालक वळंजू यांनी त्‍यांच्‍या भाषणात महापौर झालो असलो, तरी बाजार समिती पोटनियमांमुळे सभापती, उपसभापती होता आले नाही. २८ वर्षे त्या दोन्ही खुर्च्यांकडे पाहतोय, मर्जी असून सभापती होता येत नसल्‍याची खंत व्‍यक्‍त केली. तसेच समितीच्‍या सभापती पदाची महापौर पदासारखी अवस्‍था झाली आहे. चार-आठ महिन्‍यांचे सभापती होत असल्‍याचा चिमटा त्‍यांनी काढला. यावर वाडकर यांनी कोणाला किती महिने संधी द्यायची ते आमचे नेते ठरवतील, त्‍याची चिंता करू नका, अशी कोपरखळी मारली.

पुढच्‍या वर्षीच्‍या एसटीत बसावे लागणार

सभापतिपदी माझा नंबर लागणार असे वाटत होते. पण देसाईंचे नाव निश्‍चित झाल्‍याने आता पुढच्‍या वर्षीच्‍या एसटीत बसावे लागणार, असे वाडकर यांनी म्‍हणताच संचालकांमध्‍ये हश्शा पिकला. संचालक बाळासाहेब पाटील यांनी टी-२० चा जमाना आहे. सभापतीपदाचा कार्यकाळ कमी असला, तरी दमदार बॅटिंग करायला पाहिजे, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT