India sugar industry | युद्धामुळे भारतीय साखर कारखानदारीला दिलासा? 
कोल्हापूर

India sugar industry | युद्धामुळे भारतीय साखर कारखानदारीला दिलासा?

क्रूडचे दर भडकल्याने ब्राझील इथेनॉल निर्मितीकडे वळण्याच्या मार्गावर

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : मध्यपूर्वेत चिघळलेले युद्ध, जागतिक तेल बाजारात क्रूड ऑईलचे चढलेले भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाने घेतलेली लोळण या पार्श्वभूमीवर भारतीय साखर कारखानदारीच्या अर्थकारणाला आशेचा किरण दिसतो आहे. युद्धस्थितीत क्रूड ऑईलच्या भडकलेल्या दराने ब्राझीलची साखर कारखानदारी साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याच्या तयारीत आहे. यामुळे जागतिक बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्थितीत भारताला निर्यातीसाठी चांगले दिवस आल्याचे साखर उद्योगातील विश्लेषकांचे मत आहे. स्वाभाविकतः साखर निर्यातीला गती मिळाली, तर निर्यातीला भाव अपेक्षेेइतका तरी मिळू शकतो. त्याखेरीज देशांतर्गत बाजारात साखरेने किलोला 40 रुपयांचा भाव गाठला, तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

देशात आगामी साखर हंगामासाठी सुमारे 65 लाख मेट्रिक टन साखर आरंभीची शिल्लक असणार आहे युद्धस्थितीत भारतीय साखर कारखानदारीने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांबरोबर साखरेचे काही निर्यात करार सुरू केले आहेत. या करारामध्ये देशांतर्गत साखरेपेक्षा थोडी अधिक किंमत मिळते आहे. परंतु, ब्राझीलचा ऊस जर इथेनॉलकडे वळाला आणि जागतिक बाजारात ब्राझिलियन साखरेची आयात जर कमी झाली, तर भारतीय साखरेला उठाव करता येणे शक्य आहे. निर्यातीचा आणखी 15 ते 20 लाख मेट्रिक टनाचा कोटा वाढविला, तरीही जागतिक बाजारात साखर चार पैसे अधिक मिळवून देऊ शकते. यामुळे कारखानदारीवर निर्माण झालेला आर्थिक ताण मोकळा होण्यास मदत होऊ शकते.

...तर भारताला मोठी संधी

यंदा जागतिक तेल बाजारातील स्थिती चिंताजनक आहे. गतवर्षी सरासरी प्रतिबॅरल 60 डॉलर्सवर स्थिर असलेले क्रूड ऑईलचे दर यंदा 100 डॉलर्सची मर्यादा ओलांडून गेले आहेत. ब्राझीलकडे साखर उत्पादनाचे इथेनॉलकडे वळविण्याचे तंत्रज्ञान जगात अद्ययावत आहे. यामुळे या भडकलेल्या क्रूड दराचा लाभ ब्राझील उठविल्याशिवाय राहणार नाही. स्वाभाविकतः तेथे साखर उत्पादन कमी झाले, तर साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या भारताला मोठी संधी मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT