kolhapur | युद्धामुळे ‘एमआयडीसी’तील उद्योगांना 300 कोटींचा फटका 
कोल्हापूर

kolhapur | युद्धामुळे ‘एमआयडीसी’तील उद्योगांना 300 कोटींचा फटका

निर्यातीसह कच्च्या मालाची साखळी विस्कळीत; उत्पादनावर थेट परिणाम

पुढारी वृत्तसेवा

सुनील कांबळे

नागाव : अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्ध आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीमधील तणावामुळे कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध फौंड्री आणि इंजिनिअरिंग उद्योगाला मंदीचे ग्रहण लागले आहे. परिणामी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये या बारा दिवसांत सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. यामुळे शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील उत्पादनावर थेट परिणाम झाला आहे.

कोल्हापुरातून दरमहा युरोप, अमेरिका आणि देशांना होणारी सुमारे 100 ते 125 कोटी रुपयांची निर्यात संकटात आली आहे. जहाजांच्या मार्गात झालेला बदल आणि वाढविण्यात आलेले विमा हप्ते यामुळे कंटेनर्स बंदरांवरच आहेत. कच्च्या मालाचा फटका: फौंड्रीसाठी लागणारा पिग आयर्न आणि भंगार यांच्या किमतीत गेल्या 15 दिवसांत प्रति टन 5 ते 7 हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन खर्चात 15 ते 20 टक्क्यांची वाढ होऊन सुमारे 75 ते 100 कोटींचे अतिरिक्त आर्थिक बोजा उद्योजकांवर पडलेला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांमधील अडचणींमुळे निर्यातदारांचे कोट्यवधींचे पेमेंट रखडले आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेतील पैशांची उलाढाल थांबली असून लघु उद्योजकांचे खेळते भांडवल संपले आहे.

प्रमुख फटका बसलेले क्षेत्र

1. ऑटोमोबाईल सुटे भाग : प्रामुख्याने इंजिन ब्लॉक्स आणि मशिन्ड कंपोनंटस्ची निर्यात रखडली.

2. टेक्स्टाईल आणि गारमेंट : आखाती देशांमध्ये होणारी कापड निर्यात 20 टक्क्यांनी घटली.

3. कृषी पंप आणि इंजिन : आफ्रिकन देशांना होणारा पुरवठा युद्धजन्य मार्गांमुळे लांबणीवर पडला आहे.

उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण

जिल्ह्यात सुमारे 500 फौंड्री आणि 2,500 पेक्षा जास्त मशिन शॉप्स आहेत. सरासरी दिवसाला 10 ते 12 कोटींची उलाढाल करणार्‍या या क्षेत्राला युद्धाच्या ठिणगीने ग्रासले आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्यास वाहतूक खर्च वाढून स्थानिक उत्पादने महाग होतील, अशी भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT