गडहिंग्लज : आई-वडील प्रचंड काबाडकष्ट करून संसाराचा गाडा चालवितात. आपणही काहीतरी ध्येय बाळगून घरच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय सेवेत गेले पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून त्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून सैन्य भरतीसाठी आवश्यक सराव सुरू ठेवला होता. नित्यनियमाने धावण्याचा सराव करणार्या वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील शुभम धनाजी आडावकर या 23 वर्षीय युवकाला मंगळवारी मात्र सरावानेच जणू गाठल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी पाचच्या सुमारास वडरगे गावातून बहिरेवाडीकडे धावण्यासाठी गेलेला शुभमला वाटेतच हृदयविकाराचा धक्का बसला अन् त्याचे भरतीचे स्वप्न अधुरेच राहिले.
शुभमचे वडील गवंडी काम, तर आई शेती करते. त्याचा लहान भाऊ सध्या शिक्षण घेत असून, पोलिस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी शुभमने गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने शारीरिक चाचणीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी धावणे महत्त्वाचे असल्याने तो मित्रांसोबत नित्यनियमाने धावायला जात होता. काही दिवसांपूर्वी त्याने लेखी परीक्षेची तयारी पूर्णत्वास नेली होती. त्यामुळे आता शारीरिक परीक्षेसाठी त्याला व्यायाम आवश्यक असल्याने त्याने त्याचा सराव सुरू ठेवला होता.
मंगळवारी सकाळी पाचच्या सुमारास शुभम मित्रांसोबत नेहमीप्रमाणे धावण्यासाठी घराबाहेर पडला. साडेपाचच्या सुमारास त्याला बहिरेवाडीनजीकच्या राईस मिलजवळ हृदयविकाराचा धक्का बसला अन् तो जागेवरच कोसळला. सोबतची मुले गावाच्या दरम्यान पोहोचली, तरीही शुभम आला नाही, हे लक्षात येताच ती माघारी फिरली; मात्र तोवर कुणीतरी शुभमला रस्त्याकडेला निपचित पडल्याचे पाहिले अन् त्याला गाडीवरून खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी शुभमचा जागेवरच हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगताच सोबतच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले.
दररोज हसतखेळत भरतीचे स्वप्न घेऊन धावणारा मित्र अचानक निघून गेल्याने या मित्रांच्या मनावरही आघात झाला. आई-वडील व भावावरही दु:खाचा डोंगर कोसळला. भरतीचे स्वप्न घेऊन धावणार्या शुभमला हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच थबकविल्याने त्याच्या भरतीच्या स्वप्नांचा मात्र चुराडाच झाला.