कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. ७) मतदान होणार आहे. सत्ताधारी समर्थ पॅनेलसह चित्रकर्मी पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. राज्यातील १२ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.
या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनेल तर सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली चित्रकर्मी पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याशिवाय १६ अपक्ष उमेदवारही रिंगणात असून, त्यापैकी आठ जणांनी एकत्र येत तिसरी आघाडी केली आहे. समर्थ पॅनेलचे दोन उमेदवार तर चित्रकर्मी पॅनेलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यकारिणीच्या एकूण १७ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार आणि अटीतटीची ठरणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील १२ मतदान केंद्रांवर ३,४०३ पात्र सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहे.
सोमवारी निकाल
दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व केंद्रांवरील मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कोल्हापुरात आणण्यात येणार आहेत. सोमवार, ८ जून रोजी कोल्हापुरात मतमोजणी होणार असून, त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडके यांनी दिली.