कोल्हापूर

kolhapur | मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त

आघाडीप्रमुख, उमेदवारांना नोटिसा; समाजकंटकांवर नजर : मिरवणुकांना बंदी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले. रविवारी (दि. 21) मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदा, नगरपंचायत क्षेत्रात पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. मतमोजणीनंतर शांतता- सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. स्थानिक आघाडीप्रमुखांसह उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास, गुलाल उधळण्यास, कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यास पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून संबंधित यंत्रणा जप्त करण्याचे आदेशही त्यांनी प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून बंदोबस्ताचा आढावा

कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक गुप्ता यांच्याकडून शनिवारी सकाळी आढावा घेतला. मतमोजणीनंतर जिल्ह्यात कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. प्रभारी अधिकार्‍यांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या.

संवेदनशील प्रभागांत पोलिस फौजफाटा

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, वडगाव, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड, हुपरी, शिरोळ नगरपरिषद, तसेच आजरा, हातकणंगले व चंदगड नगरपंचायतींसाठी रविवारी सकाळी मतमोजणी होत आहे. मतमोजणी केंद्रांसह संवेदनशील ठरलेल्या प्रभागांसह मध्यवर्ती चौक, बाजारपेठा व प्रमुख मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.

जयसिंगपूर, कुरुंदवाड, कागल, वडगाव येथील हालचालींवर करडी नजर

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतींसाठी चुरशीची निवडणूक झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकालाकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषकरून, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, वडगाव, कागल, गडहिंग्लज व मुरगूड येथील हालचालींवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. मतमोजणीनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची प्रभारी अधिकार्‍यांनी दक्षता घेतली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई झालेल्या समाजकंटकांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात आली आहे. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांशी संपर्क साधून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT