kolhapur municipal election | एकावेळी एकाच प्रभागाची मतमोजणी Pudhari File photo
कोल्हापूर

kolhapur municipal election | एकावेळी एकाच प्रभागाची मतमोजणी

दहा टेबलवर प्रक्रिया; सात निवडणूक कार्यालयांसमोर मंडप व सुरक्षेची तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी (दि. 15) मतदान आणि शुक्रवारी (दि. 16) मतमोजणी होणार आहे. मतदानाला अवघे दोनच दिवस उरल्याने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

16 जानेवारी रोजी होणारी मतमोजणी कसबा बावडा रमणमळा, व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, गांधी मैदान पॅव्हेलियन आणि दुधाळी मैदान पॅव्हेलियन या चार ठिकाणी होणार आहे. एक निवडणूक कार्यालयांतर्गत तीन प्रभाग असून, अशी एकूण सात निवडणूक कार्यालये आहेत. या सात कार्यालयांंतर्गत येणार्‍या 20 प्रभागांची मतमोजणी या चार केंद्रांवर होणार आहे.

महापालिकेच्या 20 प्रभागांतून 81 नगरसेवक निवडून द्यायचे असून, यासाठी 327 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी थांबणार आहे. गुरुवारी होणार्‍या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून शहरातील 595 मतदान केंद्रांवर सुमारे 4 लाख 94 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 900 मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एकावेळी दहा टेबलवर मतमोजणी होणार असून एक प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांभोवती मंडप, सुरक्षा व्यवस्था व इतर आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

रमणमळा येथे 9 प्रभागांची मतमोजणी होणार

मतमोजणीच्या ठिकाणांचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. कसबा बावडा रमणमळा येथे तीन निवडणूक कार्यालयांची मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यालय क्रमांक 1 (महासैनिक प्रशिक्षण केंद्र) अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 व 5 ची मतमोजणी होईल. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 7 अंतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17 व 18 ची मतमोजणी रमणमळा येथे होणार आहे. यशवंत सभागृह, शहाजी कॉलेज येथे निवडणूक कार्यालय क्रमांक 6 अंतर्गत प्रभाग क्रमांक 12, 13 व 14 ची मतमोजणी होईल.

व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे प्रभाग क्रमांक 2, 3 व 4, तर राजोपाध्याय बॅडमिंटन हॉल येथे प्रभाग क्रमांक 9 व 20ची मतमोजणी होणार आहे. गांधी मैदान पॅव्हेलियन येथे प्रभाग क्रमांक 10, 11 व 19, तर दुधाळी मैदान पॅव्हेलियन येथे प्रभाग क्रमांक 6, 7 व 8 ची मतमोजणी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT