शिरीष आवटे
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं...’च्या जयघोषात व ढोल, कैताळाच्या तालावर भंडारा, खारीक व खोबऱ्याची प्रचंड उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश व गोवा राज्यांत प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडोलीच्या यात्रेस रविवारी भाकणुकीने उत्साहात सुरुवात झाली.
दुपारी यात्रेचे प्रमुख मानकरी प्रकाश पाटील, रणजित पाटील, चौगुले, कुलकर्णी, गावडे, मगदूम, देवस्थान कमिटी, ग्रामस्थ, पुजारी धनगर समाज मोठ्या लवाजम्यासह मानाच्या दुधारी तलवारीचे पूजन करून वाजतगाजत खेलोबा फरांडेबाबा भेटीसाठी आले. यावेळी धनगरी ढोल, छत्र्या, मानाची बाशिंगे घेऊन धनगर समाजाच्या पंचमंडळींनी फरांडेबाबांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. निमंत्रण स्वीकारून खेलोबा फरांडेबाबा हेडाम नृत्य (तलवारीने पोटावर वार करीत) खेळत व भक्तगण ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं...’चा गजर करत मंदिरात आले.
यावेळी संपूर्ण परिसर भंडाऱ्याने पिवळा झाला होता. त्यामुळे वातावरणाला सोन्याची झळाळी आली होती. भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भक्त मंदिर व परिसरात जमले होते. भाकणूक होताच फरांडेबाबा श्री विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गादीवर विराजमान झाले. भाविकांनी फरांडेबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यात्रेतील भाकणूक कार्यक्रम रविवारी असला तरी सोमवारी दुसरी व तिसरी पालखी, मंगळवारी भर यात्रा, चौथी पालखी, सार्वजनिक नैवेद्य, बुधवार, दि. 15 रोजी फूट यात्रा, पाचवी पालखी, आराधना, गुरुवार, 16 रोजी गोंधळ नृत्य सोहळा आणि शुक्रवार, दि. 17 रोजी फरांडे महाराजांचा निरोप समारंभ होणार आहे.
श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा भव्य प्रमाणात भरली असून, स्वेटर दुकाने, घोंगडी, मिठाई, भंडारा खेळणी, खाद्यपदार्थ, खारीक, खोबरे विक्रेत्यांची दुकाने आली आहेत. भंडाऱ्याची प्रचंड उधळण झाल्याने मंदिर परिसरात भंडाऱ्याचे थर साचले आहेत. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान यात्रा कमिटी, ग््राामपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा परिश्रम घेत आहे.
पर्जन्य : सात दिवसांत पाऊस पडेल.
बळीराजा : रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा पूर्ण देशात होईल.
धारण : दोन, सव्वा दोन, अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल.
महागाई : मिरची, रसभांडे कडक होईल.
भू माता : भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल.
आशीर्वाद : नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वत: मेंढ्या राखीन.
राजकारण : राजकारणात गोंधळ होऊन उलथापालथ होईल, धर्माचे, भगव्याचे राज्य येईल.
रोगराई : देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल.
कांबळा : माझ्या गुरूचे चरण जो धरेल, त्याला मी सदैव कांबळ्याखाली धरेन.
पट्टणकोडोली : हेडाम खेळताना फरांडे बाबा.