कोल्हापूर : विशाळगडावरील उरुसावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करत हा उरुस उधळून लावण्याचा इशारा बुधवारी हिंदू एकता आंदोलनाने दिला. विशाळगडावरील सर्वच अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू एकताने निदर्शनेही केली. माजी आमदार नितीन शिंदे यांनी यावेळी न्यायालयात योग्य बाजू मांडण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा दावा केला.
शिंदे म्हणाले, विशाळगडावरील दर्गा आणि उरुस बेकायदेशीर आहे. या ठिकाणी कोंबडी व बोकडांचा बळी दिला जातो, जुगार खेळला जातो आणि दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा अवमान आहे. येथील उरुस बंद करावा आणि गडावरील सर्व अतिक्रमण हटवले जावेत, अशी आमची मागणी आहे. हिंदू एकता आंदोलनाने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन देत विशाळगडावरील अतिक्रमण आणि उरुस बंद करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, अतिक्रमणावरील निर्णय न्यायालयात प्रलंबित असून जून अखेरीस त्यावर अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. यावेळी गणेश नारायणकर, संजय सोडोलीकर, प्रतीक डिसले, सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव, राजू जाधव, किशोर घाटगे, मनोहर सोरप, प्रसाद रिसवडे, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, हिंदुराव शेळके आदी उपस्थित होते.
विशाळगडावर 158 अतिक्रमणे होती. त्यापैकी 14 अतिक्रमणे काढली आहेत. बाकीच्या 64 अतिक्रमणांपैकी 45 लोकांनी न्यायालयात स्थगिती घेतली आहे. माजी आमदार शिंदे यांनी राज्य शासनाला वकिलांची फौज उभी करण्याची आणि स्थगिती उठवून उर्वरित अतिक्रमणावर बुलडोजर फिरवण्याची मागणी केली आहे.