विशाळगड : सर्वधर्मियांच्या एकात्मकतेचे प्रतिक असलेल्या किल्ले विशाळगडावरील हजरत पिर मलिक रेहान उरूस रविवारी (दि.१२) ते मंगळवारी (दि १४) या तीन दिवसाच्या कालावधीत धार्मिक वातावरणात होणार होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने गडावर सण, इतर धार्मिक कार्यक्रम करण्यास ऐन उरूस काळात बंदी घातल्याने मोठ्या उत्साहात होणारा उरूस स्थानिक पुजाऱ्यांच्या उपस्थित धार्मिक विधी करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
उरुसास महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तसेच गडाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असल्याने हिंदू-मुस्लिम भाविकांची मोठी गर्दी असते. वर्षातून दोनदा उरूस भरतो. पहिला उरूस बकरी ईदनंतर येतो तर दुसरा उरुस जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात भरतो. उरुस तीन दिवस चालतो.
उरूसाच्या पहिल्या दिवशी तुरबतीला चुना व चंदन लावणे, पोथी पठण करणे आदी धार्मिक विधी, दुसऱ्या दिवशी संदल विधी म्हणजे गंधरात्र साजरी केली जाते. तिसऱ्या दिवशी चाँदसाहेब इमारतीकडे गलेफ मिरवणूक काढली जाते. त्यानंतर उरुसाची सांगता होते. उरूसाच्या तीन दिवसाच्या कालावधीत रातीब, पोथी पठण, कव्वालीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडतात. मात्र गडावर सण, उत्सव व धर्मिक विधी करण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने उरुसावर बंदीचे सावट आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शाहुवाडीचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गडावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत गडावर पर्यटकांनी हजेरी लावली. पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने गडाच्या पायथ्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दिवसभर गजबजलेला गड सायंकाळी पाचनंतर रिकामा झाला. त्यामुळे गडावर शुकशुकाट होता.
सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतीक असलेला विशाळगड आज अनेक समस्येच्या चक्रव्यूहात सापडला आहे. गडावरील हिंदू-मुस्लिम बांधवांवर सरकारने अन्याय केला आहे. गडवासीयांची उपासमार होत आहे. गड पूर्णतः खुला करून गडवासीयांना दिलासा द्यावा. दरवर्षी प्रमाणे उरूस साजरा झाला नाही.आयुब कागदी, सामाजिक कार्यकर्ते, विशाळगड