कोल्हापूर

Vishalgad Fort Conservation : विशाळगडाच्या इतिहासाला उजाळा! ४ कोटींच्या निधीतून संवर्धनाचे कार्य 'युद्धपातळीवर' सुरू

​Kolhapur news update | दै. पुढारीच्या पाठपुराव्याला यश; ढासळलेले बुरुज आणि तटबंदी पुन्हा होणार दिमाखात उभी

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि सह्याद्रीच्या कुशीतील 'अभेद्य रत्न' म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक विशाळगड आता कात टाकणार आहे. 'दै. पुढारी'ने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, पुरातत्त्व विभागाने गडाच्या पुनरुज्जीवनासाठी कंबर कसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय दुर्लक्षामुळे दुरवस्थेत असलेल्या या किल्ल्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दुरुस्तीचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

​कोकण आणि घाटमाथा यांच्या सीमेवर वसलेला विशाळगड आजही शिवछत्रपतींच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देत उभा आहे. शिलाहार राजा मारसिंह यांनी १०५८ मध्ये बांधलेला हा किल्ला स्वराज्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये हा किल्ला जिंकून त्याचे नाव 'विशाळगड' ठेवले. इतिहासाच्या पानांत या किल्ल्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले ते पन्हाळगडाच्या वेढ्यामुळे. सिद्धी जोहरचा वेढा फोडून महाराज विशाळगडाकडे निघाले होते, तेव्हा याच किल्ल्याने त्यांना सुरक्षित आश्रय दिला होता.

जुलै २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडावरील लोखंडी शिडीजवळील बुरुज आणि तटबंदीचा मोठा भाग कोसळला होता. सध्या या ठिकाणी ढासळलेले बुरुज, भेगाळलेल्या तटबंद्या आणि निखळलेल्या पायऱ्यांची डागडुजी केली जात आहे. विशेष म्हणजे, हे काम करताना आधुनिक सिमेंट-काँक्रीटचा वापर न करता, पुरातत्त्वीय निकषांनुसार जुन्या पद्धतीचे दगडी बांधकाम केले जात आहे. शिवकालीन मार्गावरील दगड शास्त्रोक्त पद्धतीने बसवून गडाचे मूळ सौंदर्य जपले जात आहे.

दुर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

​शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या 'खेळणा' किल्ल्याची स्थिती पाहून शिवभक्त हळहळत होते. मात्र, आता पुन्हा एकदा तटबंदीतील झाडे-झुडपे काढून, उत्खनन करून बुरुज दिमाखात उभे राहत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुरातत्त्व विभागाने ठेवले आहे. यामुळे गडाचे आयुष्य वाढणार असून पर्यटकांचा प्रवासही सुरक्षित होणार आहे. विशाळगडाच्या या कायापालटामुळे ऐतिहासिक वारसा जतन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, 'गड उजळणार' या भावनेने दुर्गप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

​ "विशाळगड हा आमची अस्मिता आहे. गडाचे बुरुज पुन्हा दिमाखात उभे राहत असल्याचे पाहून समाधान वाटते. प्रशासनाने हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, हीच अपेक्षा."
संजय नाईक, एक दुर्गप्रेमी
​"गडाचे मूळ सौंदर्य जपण्याला आमचे प्राधान्य असून, ऐतिहासिक निकषांनुसारच सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली होत आहेत."
—विलास वाहने (पुरातत्त्व विभाग, पुणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT