kolhapur | अतिक्रमण काढल्याच्या रागातून बिंदू चौकात राडा  
कोल्हापूर

kolhapur | अतिक्रमण काढल्याच्या रागातून बिंदू चौकात राडा

दगडफेकीसह तलवार हल्ला; दोन्ही गटांतील पाच जखमी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : बिंदू चौक बडी मस्जिद परिसरात अतिक्रमण कारवाईवरून दोन गटांत शुक्रवारी सायंकाळी तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी दगडफेक करून तलवार हल्ला केला. यामुळे नमाज पठणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धावपळ झाली. या घटनेत दोन्ही गटांचे पाचजण जखमी झाले आहेत.

शमशेर सिराज नुराणी (वय ४२), अक्रम शौकत शिकलगार (४०), इकबाल सिराज नुराणी (४०, तिघेही रा. बिंदू चौक), उमर खैयाज बालेचाँद बागवान (५५), शाहरूख उमर खैयाज बागवान (३०, दोघेही रा. गंजी गल्ली) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे नागरिकांसह व्यापारी भयभीत झाले. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तत्काळ बंद केली. नागरिकही घरांमध्येच थांबले. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

जनहित याचिका दाखल केल्‍याच्‍या कारणावरून हल्ला

अतिक्रमण हटवण्‍यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या वादावादीतूनच दगडफेक, तलवार हल्‍ल्‍याचा प्रकार घडल्‍याचे समो आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गंजी गल्लीतील अतिक्रमण हटवण्यासाठी इकबाल नुराणी याने जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्‍यान महापालिकेने दोन दिवसांपूर्वी या परिसरातील हातगाड्या हटविल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली. यानंतर इकबाल नुराणी याचेही बिंदू चौक येथील लॉज महापालिकेने सील केले आहे.

यातून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इकबाल नुराणी आणि परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यास सुरुवात झाली. यातच दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात झाली. काही तरुणांनी थेट तलवारीने हल्ला केल्यामुळे घटनास्थळावर पळापळ झाली. नमाज पठणासाठी आलेले नागरिकही भयभीत होऊन मस्जिदमध्ये गेले. दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हॉटेल व्यावसायिक, विक्रेते आमने-सामने

इकबाल नुराणी याचे बिंदू चौक येथे लॉजिंग आहे. लॉजिंगच्या दारात तो परिसरातील रहिवाशांना वाहने लावण्यास मनाई करत होता. यामुळे परिसरातील व्यापारी, रहिवाशांमध्ये नुराणीबद्दल असंतोष होता. तर परिसरातील व्यापारी ग्राहकांना त्रास देत असल्याचा राग नुराणीच्या मनात होता. यातूनच वादाची ठिणगी पडून राडा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT