जयसिंगपूर : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात देवदासींची प्रथा आहे. या देवदासींच्या मुलांना समाजव्यवस्थेत जगणे मुश्किल झाले असताना गेल्या 40 वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील तब्बल 30 हजार मुलांना शिक्षण देऊन योग्य पाठबळामुळे ‘विमोचना’च्या संस्थेने घडविले आहे. मलाबाद (ता. अथणी, जि. बेळगाव) येथे देवदासीच्या मुलांसाठी निवासी शाळा असून अॅड. बी. एल. पाटील यांच्या माध्यमातून त्या 30 हजार मुलांचे आयुष्य सुकर बनले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर यासह अन्य जिल्हे व उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, रायचूर, बिदर, कलबुर्गी, गदग यासह अनेक जिल्ह्यांत देवदासी पद्धत सुरूच होती. देवदासी व त्यांच्या मुलांचे जगणे कठीण होते. त्यांना समाजव्यवस्थेत अपमान सहन करावा लागत होता. देवदासी पद्धतीचा नायनाट करण्याबरोबरच त्यांच्या मुलांचे जगणे सुसह्य करून समाजात त्यांना स्वतःच्या पायावर उभारण्याचे बळ देण्याचे काम अथणी येथील ‘विमोचना’ या संस्थेने केले आहे.
बी. एल. पाटील या वकिलांनी ‘विमोचना’ संस्थेची सुरुवात केली. एम. व्ही. पाटील, रणमोहे, जोगन शंकर, संघाचे ज्येष्ठ नेते अरविंदराव देशपांडे, के. एस. मनवाडे आदी ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने विमोचनाची स्थापना झाली. 1 सप्टेंबर 1985 रोजी देवदासींच्या पुनर्वसनासाठी सुरू झालेल्या या संस्थेच्या वतीने देशातील देवदासींच्या मुलांसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. यातील मुले महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध ठिकाणी नोकर्या करत आहेत. पोलिस, महसूत खाते, आरोग्य खाते, शिक्षण खात्यात सेवा बजावत आहेत.
विमोचना संस्थेच्या वतीने पूर्व प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत व नर्सिंगपर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे. पुढील शिक्षणासाठी नागनूर, गदग, इलकल व सुतूर मठाधीशांचे सहाय्य घेतले जात आहे. मलाबाद येथील निवासी शाळेत तर संगणक व शिलाईचे प्रशिक्षणही दिले जात आहे.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समानतेसाठी केलेल्या चळवळीची प्रेरणा घेऊन व इलकल येथील महांत स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली देवदासी या अनिष्ट प्रथेवर आघात करण्याबरोबरच देवदासींच्या मुलांचे पुनर्वसन करण्याचे काम केले आहे. आज संस्थेतून तब्बल 30 हजार मुलांनी शिक्षण घेतले आहे. हजारोंना नोकर्या मिळाल्या. ते विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याचे आम्हाला समाधान आहे.अॅड. बी. एल. पाटील, संस्थापक विमोचना संस्था, अथणी