कोल्हापूर : महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विजयसिंह ऊर्फ रिंकू वसंतराव देसाई यांचा कुणबी जातीचा ओबीसी दाखला जात पडताळणी समितीने सोमवारी अवैध ठरविला. परिणामी, देसाई यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
मात्र, याबाबत महापालिकेकडे अधिकृत पत्र आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जात पडताळणी समितीकडून लेखी माहिती आलेली नाही, पण त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती असल्याचे तक्रारदार काँग्रेसचे उमेदवार नंदकुमार पिसे यांनी सांगितले. देसाई हे प्रभाग क्र. ९ मधील नागरिकांचा मागास प्रवर्गातून सर्वाधिक साडेसात हजारच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी पिसे यांनी देसाई यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जात पडताळणी समितीकडे सुनावणी झाली.
जात पडताळणी समितीपुढे कुणबी जातीची सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. दाखला अवैध असल्याबाबत अद्याप ठोस कागदपत्रे समितीकडून मिळालेली नाहीत. दाखला अवैध ठरला असल्यास कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयात दाद मागू.विजय देसाई, नगरसेवक