कोल्हापूर : आयुष्यभर शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करणारे, हजारो कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे आणि समाजसेवेलाच आयुष्याचे ध्येय मानलेले शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील (दादा) अनंतकाळाच्या प्रवासाला निघून गेले. बुधवारी (दि. ५) सायंकाळी ६.१० वाजता कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या साक्षीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ‘ज्ञानसूर्य’ अनंतात विलीन झाले. अखेरचा निरोप देताना संपूर्ण परिसर भावनांनी ओथंबून गेला. हजारो डोळ्यांतून वाहणारे अश्रू, हात जोडून उभे असलेले नागरिक आणि ‘डी. वाय. दादा अमर रहे’च्या घोषणांनी भारावलेले वातावरण पाहून प्रत्येकाचे मन हेलावून गेले. पोलिस दलाच्या वतीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. गुरुवारी (दि. ६) सकाळी १० वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.
बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात होताच कसबा बावड्यातील रस्ते जनसागराने भरून गेले. डी. वाय. दादांचे पार्थिव भारतीय तिरंगा ध्वजामध्ये लपेटले होते. अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या हजारो चाहत्यांनी रस्ता ओथंबला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले नागरिक हात जोडून दादांना अंतिम अभिवादन करत होते. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. अंत्ययात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जात होती. सायंकाळी ५.१० वाजता पॅव्हेलियन मैदानावर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव पोहोचताच शोकमग्न वातावरण आणखी गहिवरून गेले. पोलिस दलाच्या वतीने पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चौथऱ्याजवळ नेण्यात आले. पोलिस दलाने पार्थिवावरील तिरंगा ध्वज काढून डी. वाय. दादा यांचे सुपुत्र डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
सायंकाळी ५.२९ वाजता डी. वाय. दादा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चौथऱ्यावर ठेवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व डी. वाय. दादांचे सुपुत्र डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता पोलिस दलाच्या वतीने शोक सलामी देण्यात आली. पोलिस दलाच्या वतीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. सायंकाळी ६.१० वाजता डॉ. संजय डी. पाटील यांनी भडाग्नी दिला. यावेळी वातावरण आणखीनच घनगंभीर बनत गेले आणि उपस्थित अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला. ज्यांनी आयुष्यभर इतरांचे जीवन उजळवले, त्या व्यक्तीला निरोपाचा हा अनेकांसाठी असह्य क्षण होता. ज्या कसबा बावड्यात दादांनी कित्येक शिक्षण संस्थांचे, सामाजिक उपक्रमांचे संकल्प सोडले, जिथे त्यांनी हजारो तरुणांना भवितव्याचे स्वप्न पाहायला शिकवले, त्याच भूमीत ते पंचत्वात विलीन झाले. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपले छत्र गमावल्याचे दुःख दिसत होते.
शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, डॉ. उद्धव पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील, दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, सोमनाथ पाटील, डॉ. यशराज पाटील, माजी आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. प्रतिमा सतेज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, कु. देवश्री सतेज पाटील, राजेश खडके, देवराज पाटील, निशांत पाटील, सुशांत पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील, प्रतापराव चव्हाण-पाटील, सौ. सुप्रिया प्रतापराव चव्हाण-पाटील, मेघराज काकडे, सौ. राजश्री काकडे, डॉ. विजय डी. पाटील, सौ. शिवानी विजय पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, सौ. पूजा अजिंक्य पाटील, डॉ. प्रदीप पालशेतकर, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, रश्मिन चोलेरा, अनिल मोरे, अजय आवटे, सुहासराव पाटील, भरत चव्हाण-पाटील, करण काकडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
अश्रूंचा बांध फुटला!
कसबा बावड्यातील यशवंत निवासातून अंत्ययात्रेस प्रारंभ होताच अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.दाटलेल्या भावनांमध्ये डी. वाय. दादा आता आपल्यात नाहीत, ही जाणीव आणखी तीव्र होत होती. लाखो विद्यार्थ्यांच्या यशात, हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आणि समाजाच्या प्रत्येक प्रगतीत दादांचे कार्य अजरामर राहील, या शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.