Veteran actor Ashok Saraf to be conferred with Keshavrao Bhosale Memorial Award
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यावर्षी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी ही घोषणा केली.
शनिवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र व 51 हजार रुपये रोख, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यावेळी उपस्थित राहणार आहेत.
नाट्य परिषदेच्या वतीने केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या औचित्याने या पुरस्काराचे आयोजन केले जाते. पुरस्कार सोहळ्यानंतर निवेदक विघ्नेश जोशी हे अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
अशोक सराफ सत्तरच्या दशकापासून मराठी चित्रपटांत काम करत आहेत. ‘कॉमेडी किंग’ अशी त्यांची ओळख आहे. आजपर्यंत त्यांनी अडीचशेहून अधिक चित्रपटांतून अष्टपैलू अभिनयाने मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘पद्मश्री’ व ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
चित्रपट, नाटक, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत ते झळकले आहेत. या योगदानाची दखल घेऊन संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारासाठी निवड केल्याचे नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस गिरीश महाजन, किरण कांबळे, शिवकुमार हिरेमठ, हेमसुवर्णा मिरजकर आदी उपस्थित होते.