Voter Verification | प्रारूप मतदारयादीतून वगळलेल्या ४.४९ लाख मतदारांची पडताळणी 
कोल्हापूर

Voter Verification | प्रारूप मतदारयादीतून वगळलेल्या ४.४९ लाख मतदारांची पडताळणी

शनिवार-रविवारी विशेष शिबिर; गणना अर्जासाठी सोमवारपर्यंतच मुदत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : एसआयआर प्रक्रियेनंतर प्रारूप मतदारयादीतून नावे वगळलेल्या ४ लाख ४९ हजार २१३ मतदारांची पुन्हा पडताळणी सुरू आहे. या मतदारांकडून गणना अर्ज पुन्हा भरून घेतले जात आहेत. याकरिता शनिवार (दि.२८) व रविवार (दि.२९) विशेष नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. यानंतर सोमवार, दि.३० नोव्हेंबरपर्यंत हे गणना अर्ज भरून देण्याची मुदत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने गणना अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार अशा मतदारांना मतदारयादीतून जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार २१३ इतक्या मतदारांची नावे रद्द करण्यात आली. मात्र, भारत निवडणूक आयोगाने पुन्हा या मतदारांची बीएलओकडून (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. आयोगाच्या आदेशानुसार दि.१८ नोव्हेंबरपासून या मतदारांकडून पुन्हा गणना अर्ज (एन्युमरेशन फॉर्म ) देऊन ते भरून घेतले जात आहे. हे अर्ज भरून देण्यासाठी सोमवार, दि.३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. तत्पूर्वी हे अर्ज दाखल करणे सुलभ व्हावे, यासाठी शनिवार, २८ आणि रविवार, २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन केले आहे. या दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित मतदान केंद्रांवर बीएलओ उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे हे अर्ज भरून देता येणार आहेत. जिल्ह्यात प्रारूप मतदारयादीतून ४ लाख २९ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली, त्या मतदारांना पुन्हा गणना अर्ज देण्यात येत आहेत. हे अर्ज दि. ३० नोव्हेंबरपर्यंत भरून द्यावे लागणार आहेत. यानंतर त्यावर दि. १० डिसेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर दि. २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

१.४२ लाख मतदार मयत

या मतदारयादीतून वगळलेल्या ४ लाख ४९ हजार २१३ मतदारांपैकी १ लाख ४२ हजार ७४८ मतदार हे मयतच आहेत. तर ४८ हजार ९९५ मतदार दुबार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्याबाबत खात्री केली जाणार असली तरी ही नावे रद्दच होणार आहेत. अनुपस्थित असलेल्या ९७ हजार ५२२, स्थलांतरित १ लाख ५८ हजार ३२९ आणि इतर १ हजार ६१९ मतदारांपैकी आतापर्यंत ३ हजार १३६ अर्ज भरून आले आहेत. त्यात उर्वरित चार दिवसांत आणखी काही अर्जांची भर पडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT