इचलकरंजी : शहरातील आवळे मैदान परिसरातील कुंभार गल्ली येथील गायत्री भवनमध्ये गुरुवारी विषारी फुरसे जातीचा साप आढळून आला. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकाने पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
संजय दातवडे यांच्या घरी साप आल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर पोवार आणि विजय भोसले यांना मिळाली. आवश्यक खबरदारी घेत त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडले. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल संजय कांबळे आणि वनरक्षक मंगेश वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य पूर्ण करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष शेखर पोवार म्हणाले, फुरसे हा आकाराने लहान असला तरी अत्यंत विषारी साप आहे. इंग्रजीत त्याला ‘सॉ-स्केल्ड व्हायपर’ असे म्हणतात. भारतातील चार प्रमुख विषारी सापांच्या ‘बिग फोर’ गटात त्याचा समावेश होतो. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास नागरिकांनी स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा.