वन विभाग नवीन वर्षात राबविणार वनमित्र संकल्पना 
कोल्हापूर

वन विभाग नवीन वर्षात राबविणार वनमित्र संकल्पना

उपवन संरक्षक धैर्यशील पाटील : 5 जानेवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अलीकडच्या काळात मनुष्य व वन्यजीव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून नव्या वर्षात वन विभागातर्फे वनमित्र संकल्पना राबविण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांचा वावर असणार्‍या जंगलाजवळील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वनमित्रांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर या तालुक्यांतील जंगल क्षेत्राजवळ असणार्‍या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने मनुष्य व वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वन विभागाकडे उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्री तोकडी असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळविण्यावर मर्यादा आहेत. यावर उपाययोजना म्हणून स्थानिक गावपातळीवरील मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी वनमित्र संकल्पना अंमलात आणण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ज्या गावांत मनुष्य व वन्यजीव संघर्ष तीव्र आहे, अशा गावांमध्ये स्वयंसेवी तत्त्वावर 5 वनमित्र प्रायोगिक तत्त्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. पर्यावरण व प्राणी या विषयांची आवड असणार्‍या व्यक्तींची निवड करून त्यांना वनविभागाच्या वतीने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपली नावे दि. 5 जानेवारीपूर्वी जवळच्या वन विभाग कार्यालयाला कळवावी. वनमित्राचे वय 21 ते 35 वर्ष असावे. व्यक्तींची शारीरिक क्षमता चांगली असावी व याबाबतचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असावे. किमान शिक्षण 12 वी उत्तीर्ण असावे. मानधन-पगार दिला जाणार नाही. वनमित्रांनी स्वयंसेवी तत्त्वावर वनविषयक आवड असणार्‍या व्यक्तींचीच निवड करावी. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसावा. वनक्षेत्रपाल यांच्याकडून चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. निवडण्यात आलेल्या वनमित्रांना वन विभागातर्फे प्रशिक्षणासह युनिफॉर्म, बूट, ओळखपत्र आदी मूलभूत साहित्य देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नवा थर्मल ‘एआय’ ड्रोन वन विभागाकडे सक्रिय

दरम्यान, नवा थर्मल ‘एआय’ ड्रोन वन विभागाकडे सक्रिय झाला आहे. सुमारे 10 लाख किमतीचा या ड्रोनची रेंज 6 कि.मी. उंचीपर्यंत आणि सुमारे 25 कि.मी. लांब आंतरापर्यंत आहे. वन्यजीवांचा शोध घेण्यासाठी या ड्रोनचा प्रभावी उपयोग होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

वनक्षेत्रात 251 ठिकाणी जलस्त्रोत

जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात 251 ठिकाणी नैसिर्गक जलस्त्रोत आहेत. या जलस्त्रोतांचा वापर करून जंगल क्षेत्रातील प्रत्येक 4 कि.मी. परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती धैर्यशील पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT