कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे मार्गावर आता आठवड्यातून तीन दिवस स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीबाबत असणारा संभ्रम दूर झाला आहे. सोमवारी (दि.16) या गाडीचा शुभारंभ होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
हुबळी-पुणे मार्गावर रविवारी (दि.16) वंदे भारत सुरू होत आहे. ही गाडी मिरजेतून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातून मिरजेला जाऊन पुढे पुण्याला जाईल, तसेच पुण्याहून हुबळीला जाताना मिरजेहून कोल्हापूरला येईल, कोल्हापुरातून पुन्हा मिरजेला जाऊन पुढे हुबळीला जाईल, असे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आठवड्यातून तीन दिवस पुण्याला जाण्यासाठी तर तीन दिवस पुण्याहून येण्यासाठी निश्चित केले होते. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, मिरजसह बेळगाव, हुबळी आदी परिसरातील प्रवाशांनी याला विरोध दर्शवला.
यासर्व पार्श्वभूमीवर आपल्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस देण्याची मागणी केली. त्यानुसार आता दि.16 सप्टेंबरपासून आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.
ही गाडी दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी ती कोल्हापुरात येईल. या गाडीला मिरज - सांगली - किर्लोस्करवाडी- कराड आणि सातारा हे थांबे देण्यात आले आहेत.
प्रदीर्घ काळापासून कोल्हापूरकरांची असलेली मागणी पूर्णत्वास आली आहे. लवकरच कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होईल, असे खा. महाडिक यांनी सांगितले.
ही गाडी आठवड्यातून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी तीन दिवस हुबळी-पुणे, गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार अशी तीन दिवस कोल्हापूर-पुणे या मार्गावर धावणार आहे. पुणे-हुबळी मार्गावर दर गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार तर पुणे-कोल्हापूर मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. मंगळवारी या दोन्ही मार्गावर गाडी धावणार नाही. यामुळे मिरज, सांगली आणि सातारा येथील प्रवाशांना मात्र मंगळवार वगळता आठवड्यातील सहाही दिवस ही सेवा मिळणार आहे.
या गाडीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. यासह एकूण सात वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी कोल्हापूर स्थानकावर खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत. सोमवारी ही गाडी दुपारी सुटणार आहे.