कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे मार्गावर प्रवाशांना आता आठवड्यातून तीन दिवस ‘वंदे भारत’ची सेवा मिळणार आहे. सोमवार (दि. 16) पासून धावणारी हुबळी-पुणे ‘वंदे भारत’ तीन दिवस कोल्हापूरमार्गे धावणार आहे. हुबळी-पुणे मार्गावर सुरू होणारी ‘वंदे भारत’ आठवड्यातून तीन दिवस हुबळी-मिरज-कोल्हापूर-मिरज-पुणे आणि पुणे-मिरज-कोल्हापूर-मिरज-हुबळी अशी धावणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही गाडी कोल्हापूरपर्यंत येणार आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आठवड्यातून सातही दिवस ही गाडी कोल्हापूरमार्गे धावणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर-पुणे मार्गावर सोमवारपासून सेवा सुरू होणार आहे. मात्र, याबाबतचे वेळापत्रक रेल्वेकडून अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे आठवड्यातील नेमक्या कोणत्या दिवशी ही गाडी धावणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.
हुबळीहून येणारी ही गाडी कोल्हापुरात सकाळी सव्वादहाच्या सुमारास दाखल होईल. यानंतर साडेदहाच्या सुमारास ती पुण्याकडे रवाना होणार आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ती पुण्यात पोहोचणार असल्याने कोल्हापूरकरांचा पाच तासांत आरामदायी प्रवास होणार आहे. सध्या कोल्हापूर ते पुणे या रेल्वे प्रवासाला सात तास लागतात, त्या तुलनेत दोन तासांनी प्रवास कमी होणार आहे.