पूनम देशमुख
कोल्हापूर : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ ही उक्ती केवळ मानवासाठीच नाही, तर प्राणीविश्वालाही तंतोतंत लागू पडते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रेमभावनांचा उत्सव साजरा होत असताना, निसर्गातील पशू-पक्षी आणि जलचरही आपल्या जोडीदाराला खास शैलीत प्रपोज करत असल्याचे दिसून येते. माणूस गुलाब किंवा शब्दांतून भावना व्यक्त करतो; मात्र निसर्गात गंध, आवाज आणि नृत्याच्या माध्यमातून प्रेमाची केमिस्ट्री जुळवली जाते.
प्रत्येक प्राण्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे. केवळ आकर्षणच नाही, तर एकनिष्ठतेचे धडेही प्राणीविश्वातून मिळतात. वाघाची डरकाळी असो किंवा पेंग्विनची फिल्मी स्टाईल, निसर्गातील प्रत्येक जीवाची जोडीदार निवडण्याची पद्धत अत्यंत रंजक आणि विज्ञाननिष्ठ आहे. प्रेम ही भावना वैश्विक आहे आणि तिचा सोहळा साजरा करण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त जाणून घेऊया त्यांच्या रंजक प्रेमकथा...
विणीच्या हंगामात वाघीण मीलनासाठी तयार झाली की, ती विशिष्ट रसायन असलेल्या मूत्राचा शिडकावा करून नराला संकेत देते. त्या वासावरून नराला तिची उपस्थिती कळते. त्यानंतर सुरू होतात जोरदार डरकाळ्या. वाघिणीच्या संकेताला नर वाघही प्रतिसाद देत डरकाळ्या फोडतो. भेट झाल्यानंतर हीच गर्जना हळूहळू गोड गुरगुरण्यात बदलते. नराची ताकद, आरोग्य आणि रसायनांचा वास पाहून वाघीण प्रेमप्रस्ताव स्वीकारायचा की नाही, हे ठरवते.
जिराफांची प्रेमाची परिभाषा जरा वेगळीच आहे, नर जिराफ मादीच्या पोट आणि मागील भागाला आपले डोके व शरीर घासतो. त्यानंतर मादी मूत्र विसर्जन करते. नर त्या मूत्राचा वास आणि रंग तपासून ती मादी मीलनासाठी योग्य आहे की नाही, हे ठरवतो. निसर्गातील ही ‘केमिस्ट्री टेस्ट’ जिराफांच्या प्रेमकथेचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे हंस एकनिष्ठतेसाठी प्रसिद्ध आहेत. सहसा ते आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात. घरटे बांधणे, पिलांचे संगोपन आणि संकटात साथ देणे हे सर्व ते एकत्र करतात. हंस आपल्या लांब मानेने हृदयाचा आकार तयार करून जवळीक व्यक्त करतात. साधारण दोन वर्षांचे झाल्यावर ते जीवनसाथी निवडतात.
नर बेट्टा मासा हवेतून बुडबुडे तयार करून पाण्याच्या पृष्ठभागावर घरटे बांधतो. हीच त्याच्या प्रेम प्रस्तावाची सुरुवात असते. तो आपले आकर्षक, रंगीबेरंगी पंख फुलवत मादीसमोर नृत्य करतो. मादी तयार झाल्यावर नर तिला वेढून घेतो आणि ती अंडी देते. नर ती अंडी फलित करून बुडबुड्यांच्या घरट्यात जपून ठेवतो; मात्र मादीने नकार दिल्यास नर आक्रमक होऊ शकतो. निसर्गातील प्रेम कधी कोमल, तर कधी कठोरही असते.
नर आपला लांब आणि रंगीबेरंगी पिसारा फुलवत लांडोरीसमोर थिरकतो. यावेळी पिसार्यातील डोळ्यासारख्या आकृत्या आणि विशिष्ट आवाज मादीला आकर्षित करतात. लांडोरीला हे नृत्य भावले, तर ती त्याच्या जवळ येते आणि मिलनास संमती देते.
बेडकांच्या जगात आवाजाला सर्वाधिक महत्त्व आहे. नर बेडूक जोरजोरात ओरडून मादीचे लक्ष वेधतात. त्यांचा आवाज, रंग आणि घरटे बनवण्याची पद्धत यावरून मादी नराची निवड करते. अनेकदा नरांमध्ये कुस्तीही होते. जो जिंकतो, त्यालाच मादीची साथ मिळते.
पेंग्विन त्यांच्या प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जातात. या प्रजाती आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात. आपल्या साथीदारावरील प्रेम व्यक्त करताना नर पेंग्विन मादीसमोर जाऊन तिच्या पायाजवळ डोके ठेवतो. जणू एखाद्या चित्रपटातील द़ृश्यच! हा त्यांचा प्रेम व्यक्त करण्याचा खास अंदाज असतो.