कोल्हापूर : जिल्ह्यातील आणखी 8 हजार युवतींना गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ‘खुद से जीत’ या नावाने राबविण्यात येणारे हे अभियान यशस्वी करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.
मुश्रीफ म्हणाले, देशात दरवर्षी 75 हजार महिलांना या कर्करोगामुळे जीव गमवावा लागतो. पहिल्याच टप्प्यात निदान झाल्यास हा आजार बरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शालेय स्तरावर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लसीकरण अभियान सुरू केले आहे. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, जिल्ह्यात 17 हजार युवतींपैकी 9 हजार लसीकरणाचे काम पूर्ण झालेे. पुढील दहा दिवसांत शिबिर स्वरूपात दोन हजार शाळांतील उर्वरित पालकांचे संमती पत्र घेतले जाईल.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, डॉ. सत्यवान मोरे, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. अनिरुद्ध पिंपळे आदी उपस्थित होते. दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात आहे, त्यांनीच त्याला सोमवारी झालेल्या बैठकीत ‘खुद से जीत’ हे नाव दिले.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. ज्यांना चष्म्याचा नंबर निघेल, त्यांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत. 13 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींमध्ये स्तनाचा कर्करोग आहे किंवा नाही याची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.