कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. जिल्ह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व दहा आमदार निवडून आल्यामुळे महायुतीकडे इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. काही तालुक्यांमध्ये महायुतीतीलच घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष आणि ईर्षा असल्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा ते एकत्र येतील.
करवीर व गगनबावडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. या तालुक्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कै. पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. करवीर तालुक्यात पाटील यांचा गट मोठा आहे. याशिवाय करवीरमध्ये भारतीय जनता पक्षाचीही ताकद काही ठिकाणी आहे. गगनबावडा तालुक्यात काही ठिकाणी जनसुराज्य शक्तीची ताकद आहे. यामुळे करवीरचे जागा वाटप यावेळी चांगलेच रंगण्याची शक्यता आहे.
भुदरगड व राधानगरीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचे प्रबळ गट आहेत. शिंदे शिवसेनेचे आबिटकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाटील दोघेही महायुतीमध्ये एकत्र असले, तरी त्यांच्यामधील कटुता सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आबिटकर सहजासहजी आपल्या कार्यकर्त्याची जागा दुसर्याला देतील असे वाटत नाही. त्यांच्या शिवाय भारतीय जनता पक्षाचीही काही ठिकाणी ताकद आहे. राधानगरी तालुक्यात ए. वाय. पाटील गट आहे. सध्या हा गट तटस्थ असला तरी त्यांचा कल महायुतीकडे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारीवरून चांगलाच गोंधळ होण्याची शक्यता आहे.
शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यात देखील अशीच स्थिती आहे. शाहूवाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मानसिंग गायकवाड, तर पन्हाळा तालुक्यात आमदार कोरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आहेत. पन्हाळा तालुक्यातील काही गावांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांना मानणारी काही गावे आहेत. असे असले तरी आमदार कोरे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यामध्ये आपले वर्चस्व राहावे, यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रचंड आग्रही असतात. यातून त्यांच्यामध्ये वाद होऊ शकतो.
हातकणंगले तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने आहेत; परंतु आपण नेमक्या कोणत्या पक्षाचे, हेच ते बहुतेकवेळा विसरत असल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरून दिसून येते. या तालुक्यात आमदार कोरे व भारतीय जनता पक्षाच्या महाडिक व आवाडे गटाची ताकद आहे. त्यामुळे या तालुक्यात उमेदवारीसाठी चढाओढ होणार आहे. चंदगड तालुक्यातून विधानसभेला अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवाजी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांचा प्रबळ गट आहे. त्यामुळे या तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारीवरून ताणाताणी होणार आहे.
शिरोळमध्ये राजेद्र पाटील-यड्रावकर शिवसेना शिंदे गटाचे पुरस्कृत आमदार आहेत. या तालुक्यात भाजपचीही ताकद असल्याने दोघांमध्ये जागांसाठी घसाघीस होण्याची शक्यता आहे. कागल, भुदरगड व आजरा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. जिल्ह्याचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा हा मतदारसंघ. या तीन तालुक्यांतील राजकीय स्थिती पाहता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत या तीन तालुक्यांत गुण्यागोविंदाने नांदण्याची शक्यता आहे.
महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र असूनही उमेदवारीवरून गटबाजीचे वारे जोर धरू लागले आहेत. मैत्रीपूर्ण लढतीचा जप महायुतीचे काही नेते करत असले, तरी हा निव्वळ गोंडस मुखवटा ठरू शकतो. विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देणार्या महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र ‘घरभेदी’ संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कितीही सलोखा दाखवला, तरी पक्षातील इच्छुकांना मात्र आवर घालताना नाकीनऊ येणार आहेत.