कोल्हापूर : रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह वळीव पावसाच्या जोरदार हजेरीने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. खुपिरे परिसरात झालेल्या वादळी वार्याच्या पावसाने विजेचे खांब वाकले, तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्याही तुटून पडल्या. करवीर, गडहिंग्लज, कागल, पन्हाळा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी विजेचे खांब वाकले. सांगली फाट्यानजीक दुचाकीवर झाड पडले. या वळीव पावसाने काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले.
पुलाची शिरोली, हालोंडी परिसरात वादळी वार्याने सांगली फाटा कोरगावकर पेट्रोल पंपाजवळ जांभळीचे झाड दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले. नागाव, मौजे वडगाव, हेरले परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या.
दोनवडे : दोनवडे, खुपिरे, साबळेवाडी, बालिंगे परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. काही ठिकाणी विजेचे खांब पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे ते बालिंगे पुलादरम्यान रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर चिखल झाला. साबळेवाडी फाट्यावर रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प झाली होती, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोनवडे येथील प्राथमिक केंद्रासमोर पाणीपुरवठा करणार्या विहिरीजवळ विजेचे खांब वाकले. काही ठिकाणी उन्हाळी भात, भूईसपाट झाले. हत्ती गवत, मका व ऊस वार्यामुळे कोलमडले.
गडहिंग्लज ः शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर जोरदार सरी कोसळल्या. आठवडी बाजार असल्याने व्यापारी, नागरिकांची मोठी धावपळ झाली. जोरदार पावसाने रस्त्यांवरून पाणीच पाणी वाहिले.
कसबा बीड ः करवीर पश्चिम भागातील पाडळी खुर्द, महे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, सावरवाडी आदी ठिकाणी पावसाने झोडपून काढले. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. शेतकर्यांनी काढलेल्या उन्हाळी पिकांचे आणि वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ऊस पिकांना पोषक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते.
अर्जुनवाडा : राधानगरी तालुक्यातील तुरंबे, कपिलेश्वर, सरवडे परिसरात तासभर वळीव पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे काढणीला आलेला भुईमूग, तीळ, सूर्यफूल या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
देवाळे : कुरुकली परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पावसाने वातावरण गार झाले.
बाचणी : कागल तालुक्यातील बाचणी परिसरात वादळी वार्याने रस्त्यावरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या. मक्का, भुईमूग, कोबी तसेच काढणीला आलेला अन्य भाजीपाला या पावसाने धोक्यात आला आहे.
वाशी ः वाशीसह शेळकेवाडी, नंदवाळ, पिरवाडी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वादळी वार्यासह परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली.
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. हा पाऊस माळरानातील पिकाला पोषक ठरला आहे. काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
गांधीनगर : गडमुडशिंगी परिसरासह गांधीनगर, चिंचवाड, वळीवडे व सरनोबतवाडी परिसराला वळीव पावसाने झोडपले.
पाचगाव : जोरदार वार्यामुळे येथील शिक्षक कॉलनीतील गोदावरी अपार्टमेंटमधील गादी उडून जाऊन विद्युत वाहिनीवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
पन्हाळा : रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने पन्हाळगडावर जोरदार हजेरी लावली. एक तास सुरू असलेल्या पावसात 22 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने गारवा मिळाला.