Unseasonal rain | अवकाळीने झोडपले; धरण क्षेत्राताही जोर  
कोल्हापूर

Unseasonal rain | अवकाळीने झोडपले; धरण क्षेत्राताही जोर

तीन दिवस यलो अलर्ट, वाहतूक कोंडी अन् नागरिकांची तारांबळ;

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्याला अवकाळी पाऊस अक्षरशः झोडपून काढत आहे. रविवारी शहरात दुपारी दोनच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. यानंतर सायंकाळी पाच वाजता सोसाट्याच्या वार्‍यासह धुवाँधार पाऊस झाला. अर्धा तासाच्या कोसळधारांमुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. नागरिकांसह पर्यटकांची तारांबळ उडाली. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रात्री नऊपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. यामुळे ऐन हिवाळ्यात थंडी क्लीन बोल्ड झाली असून पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे.

दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार, दि. 27 ते बुधवार, दि. 29 पर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामुळे तीन दिवस पावसाचेच असण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत शहरात तुरळक पावसाची नोंद झाली तर जिल्ह्याच्या 12 तालुक्यांत सरासरी 2.7 मि.मी. पाऊस झाला. चंदगड, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यांत पाऊस झाला. तसेच तुळशी, वारणा, दूधगंगा, पाटगाव, चित्री, जंगमहट्टी, जांबरे या धरण क्षेत्रातही पाऊस झाला.

यामुळे मान्सूनसद़ृश वातावरण

भारतीय उपखंडाभोवती दोन शक्तिशाली पावसाळी प्रणाली एकाचवेळी सक्रिय झाल्याने पुन्हा एकदा मान्सूनसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘निगेटिव्ह आयओडी’ अर्थात इंडियन ओशन डायपोल या दुर्मीळ महासागरी हवामान स्थितीमुळे या प्रणालींना अधिक बळ मिळत आहे. विशेष म्हणजे दिवाळीनंतरच्या काळात अशी परिस्थिती क्वचितच पाहायला मिळते, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

हिवाळा छे... छे... पावसाळा!

वातावरणीय बदलामुळे ऑक्टोबर संपत आला तरीही पाऊस कोसळत आहे. ऐन दिवाळीत नवीन कपडे घालून फिरण्याऐवजी आता रेनकोट घालून नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे. यामुळे हा हिवाळा नव्हे तर पावसाळा म्हणण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.

सहा तास संततधार; शहराला तळ्याचे स्वरूप

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून शहरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी झालेल्या धुवाँधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते. परिख पूल, कावळा नाका परिसर, उड्डाणपूल ते कावळा नाका रोड, सीबीएस परिसर, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, राजारामपुरी, उद्यमनगर, कोंबडी बाजार परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. दरम्यान, शहरात सलग सहा तास पावसाची रिपरिप सुरू होती.

आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या काही भागात मध्यम सरी कोसळल्या. यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पुन्हा सायंकाळी पाचला सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार पाऊस सुरू झाला. अर्धा तास कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले होते. व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, ताराबाई चौक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जयंती नाला परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. यानंतर तासभर पावसाने विश्रांती घेतली. सहाच्या सुमारास पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर होता. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. शहरात रविवार आणि दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांसह नागरिकांची गर्दी होती. मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दिसेल त्या ठिकाणी आडोसा घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT