कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून वळवाच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. आजवरच्या वळीव पावसाचे उच्चांक यंदाच्या वळवाने मोडीत काढले आहेत. रायगड जिल्ह्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि राज्याला वळवाचा हा सलग आठ दिवस तडाखा बसला. वळवाच्या या दणक्याने शेतीच्या सध्याच्या पिकाला आणि फळबागा, भाजीपाल्यावर गंभीर परिणाम झाला आहे आणि आता खरीप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. वळवाच्या दणक्यामुळे खरिपाला धक्का बसण्याचा आणि खरीप पिकांचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी वळवाने हजेरी लावली. तथापि, 18 मेपासून सलग आठ दिवस महाराष्ट्रात वळवाने दैना उडवून दिली आहे. राज्याच्या सर्वच भागात वळवाचे तांडव झाले. मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला, तर मुंबईत 1951 नंतर 75 वर्षांत प्रथमच ऐन वैशाखात 22 अंशावर तापमान उतरले. मुंबईत कोसळलेल्या मुसळधार वळवाचा हा परिणाम आहे.
हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत मे महिन्यात सरासरी जेवढा वळीव पाऊस कोसळतो, त्यापेक्षा 300 पट अधिक वळीव कोसळला. राज्यात सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे 200 टक्के वळीव पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात 281 टक्के, मराठवाड्यात 250 टक्के आणि विदर्भात 306 टक्के नेहमीपेक्षा अधिक वळीव कोसळला. मे महिन्यात सरासरी जेवढा वळवाचा पाऊस होतो, त्यात गेल्या 20 वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला आहे. या आकडेवारीवरून वळवाची तीव्रता लक्षात येते.
वळीव, गारपीट, वादळी वार्याने राज्यातील शेतीला जबरदस्त तडाखा दिला आहे. 25 जिल्ह्यांतील 26 हजार 165 हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णत: बाधित झाली आहेत. त्याशिवाय हजारो हेक्टर क्षेत्रात साठून राहिलेल्या पावसाच्या पाण्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काढणीला आलेली भुईमूग, वैशाखी मूग, सोयाबीन, मका, सूर्यफूल आदी उन्हाळी पिकांचे वळवाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची नासाडी पाहण्याची दुर्दैवी वेळी बळीराजावर आली आहे.
आंबा, द्राक्षे, संत्री अशा फळबागांवर तर या वळवाच्या दणक्याने संक्रांतच आली आहे. याबरोबरच कांदा, लसूणसह भाजीपाला यावरही वळवाचा परिणाम ओढवला आहे.
आठ दिवसांपासून ठिकठिकाणी वळवाने झोडपून काढल्याने आता रोहिणीची धूळवाफ पेरणी अशक्यच झाली असून, खरीप हंगामासाठी शेती तयार करणेही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. माळरान वगळता अन्य ठिकाणी अशी अडचणीची परिस्थिती आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मुहूर्त कधी साधता येणार, हा प्रश्नच असून अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्या लांबण्याचीच शक्यता दिसत आहे.
विद्यमान परिस्थिती लक्षात घेता, खरीप हंगाम लांबला, तर खरीप उत्पादनास किमान 15 ते 25 टक्के घट होण्याची शक्यता आहे. फळबागांवरील परिणामातूनही फळबागांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
बळीराजाला नेहमीच निसर्गाच्या प्रकोपाला तोंड द्यावे लागते. यंदाचा हा प्रकोप आजवर फारसा अनुभवाला आला नव्हता. आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागावी, अशी बळीराजाची रास्त मागणी आहे.
वळवाने शेतीला तर तडाखा दिलाच; पण दैनंदिन जनजीवनही विस्कळीत झाले. फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यापारी वर्गाचीही धावपळ झाली. वीज पुरवठ्यात अडथळा येऊन पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. झाडे पडल्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. या बदलत्या हवामानाचा अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला. वळवाने असा सार्वत्रिक दणका दिला.
वळवाच्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांतील शेतीला चांगलाच तडाखा दिला आहे. उन्हाळी पिके हाती लागतील, अशी शक्यता मावळली आहे. फळे,भाजीपाल्यालाही दणका बसला आहे. जनावरांना ओला चारा आणणे अवघड झाले आहे. शेतामध्ये पाणी पाणी झाले आहे. 25 मेपासून रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. पण वळवाची झड अशीच राहिली तर रोहिणीवरील धूळवाफ पेरणी होणार का, हा प्रश्नच आहे. उसाची भरणी थांबली आहे. लागवड टाकणे कठीण झाले आहे. पाण्याचा निचरा होऊन शेतीला वाफसा यायला किमान आठ दिवस तरी लागतील. भोगावती नदीचे पाणी ऐन उन्हाळ्यात पात्राबाहेर पडले आहे, तर वीस वर्षांत राजाराम बंधार्यावर कधीच न आलेले पाणी ऐन उन्हाळ्यात आले आहे. निसर्गाच्या या रौद्र तांडवाने बळीराजा हवालदिल झाला आहे.