पेठवडगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या दोन तरुण मजुरांवर काळाने घाला घातला. गुरुवारी रात्री तळसंदेजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नरेंद्रकुमार यादव (वय 25, रा. बिहार), हेमंत पहाडी (26, रा. चंद्रापाडा, ओडिशा) अशी मृतांची नावे असून विनेशकुमार (27, रा. चंद्रापाडा, ओडिशा) हा गंभीर जखमी आहे.
गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास वाठार-कोडोली रस्त्यावर तळसंदे गावच्या हद्दीतील रेणुका हॉटेलजवळ हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही मजूर प्लंबिंगचे काम करत होते. दिवसभराचे काम आटोपून ते आपल्या दुचाकीवरून कराड येथील निवासस्थानाकडे परत जात होते. मात्र, भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला इतकी जोराची धडक दिली की, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता, तर दुचाकी दूरवर फेकली गेली होती. या हृदयद्रावक द़ृश्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली. परिणामी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली.