कोल्हापूर

विद्यापीठातून ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडापटू घडावेत : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता विद्यापीठातून ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडापटू घडावेत, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या स्पोर्टस् पॅव्हेलियनजवळील प्रस्तावित क्रीडा वसतिगृह भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, क्रीडापटूंसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यापीठाने बीए (स्पोर्टस्) हा अभ्यासक्रम चालू करून शास्त्रीय पद्धतीने खेळाडू घडविण्यासाठी उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेती कामगिरी बजावणार्‍या क्रीडापटूंना वर्ग-1 व वर्ग-2 पदांवर थेट भरती करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ दर्जेदार क्रीडापटूंना निश्चितपणे होईल.

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन झाले व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, डॉ. सागर डेळेकर, भैयासाहेब माने, अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपअभियंता हेमा जोशी, तांत्रिक समिती सदस्य डॉ. गिरीश कुलकर्णी, अभियंते रमेश पवार उपस्थित होते.

असे असेल क्रीडा वसतिगृह

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा वसतिगृह तळमजला अधिक तीन मजले असे प्रस्तावित आहे. सुरुवातीला तळमजल्याचे 1082.60 चौरस मीटर क्षेत्रफळाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी 67 लाख 27 हजार 264 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ठेकेदार सतीश घोरपडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार साईट स्वच्छतेचे काम प्रगतिपथावर आहे. एक वर्षात बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT