kolhapur | कर्जाचे हप्ते चुकले, ‘त्यांनी’ वसुली कर्मचार्‍यालाच लुटले! Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | कर्जाचे हप्ते चुकले, ‘त्यांनी’ वसुली कर्मचार्‍यालाच लुटले!

कात्यायनी घाटातील घटना उघडकीस; टोळी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : फाननान्स कंपनीचे कर्ज फेडता येत नाही म्हणून चक्क ‘त्या’ फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्‍यालाच लुटल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली. याप्रकरणी सात जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. विजय मोहन पुजारी (वय 19, रा. मंगोबा देवालयाजवळ, उचगाव, ता. करवीर), स्वरूप रमेश सावंत (21), सुशांत भगवान कांबळे (22, दोघेही रा. लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी), अविनाश आनंदा मोहिते (30), अनिकेत कृष्णात ताटे (27, दोघेही रा. इस्पुर्ली, ता. करवीर) यांसह अन्य दोन अल्पवयीन मुलांचा अटक केलेल्यांत समावेश आहे. पुजारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

4 ऑगस्ट रोजी कोल्हापूर-गारगोटी रोडवर कात्यायनी घाटात भिवटे मळा येथे ए यू स्मॉल फायनान्स बँकेचे वसुली कर्मचारी सूरज बाळासाहेब पाटील यांची पावणेदोन लाख रुपये असलेली सॅग चोरट्यांनी लंपास केली होती. करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. अट्टल चोरटा पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी ही लूट केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार टेंबलाई मंदिर परिसरात त्याच्यासह चौघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मित्र अविनाश मोहिते यांच्या सांगण्यावरून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मोहिते व त्याचा साथीदार ताटे यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकुण 3 लाख 18 हजारांचा मुद्दमाल जप्त केला.

लुटीची रक्कम वाटून घेतली...

मोहिते याने ए. यू. स्मॉल फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. फायनान्स कंपनीचे अधिकारी वसुलीसाठी त्याच्या घरी येत होते; परंतु मोहिते हा कर्ज परतफेड करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने मित्र पुजारी याच्याशी संपर्क साधून कर्ज वसुली करणार्‍या कर्मचार्‍यालाच लुटण्याचा कट रचला. पाटील यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैशाची बॅग लांबवली. ती रक्कम पुजारी, मोहिते व त्यांच्या साथीदारांनी वाटून घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT