Ichalkaranji Municipal Corporation | इचलकरंजी महापौरपदी उदय धातुंडे तर उपमहापौरपदी डाळ्या निश्चित? Pudhari File Photo
कोल्हापूर

Ichalkaranji Municipal Corporation | इचलकरंजी महापौरपदी उदय धातुंडे तर उपमहापौरपदी डाळ्या निश्चित?

भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब; राजकीय घडामोडींना वेग

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदासाठीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. महापौरपदी उदय धातुंडे तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची नावे आघाडीवर आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. शुक्रवारी (दि. 6) भाजप महायुतीच्या नगरसेवकांची बैठक होणार असून या बैठकीत या दोन्ही पदांसाठीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार आहे.

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत बहुमत मिळवत सत्तेवर आलेल्या भाजप महायुतीत महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवार निवडताना नेतेमंडळींची कसरत होत आहे. विशेषतः महापौरपदाचा पहिला मान कुणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मिरज येथेही झालेल्या बैठकीत महापौर, उपमहापौर पदाच्या नावांबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र त्यावेळी कोणत्याही एका नावावर एकमत झाले नव्हते. गुरूवारीही दिवसभर नावांबाबत चर्चा सुरू होती.

गुरुवारी भाजप गटनेते विठ्ठल चोपडे यांनी महापौर व उपमहापौर पदासाठीचे चारही अर्ज नेले. शुक्रवारी सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीस आ.राहुल आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी अंतिम नावे निश्चित करून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

भाजप नगरसेवकांना नेणार सहलीवर

पहिल्या महापौर, उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने नावांबाबत एकमत करण्यासाठी दिवसभर नेत्यांचा खल सुरू होता. इच्छुकांकडून जोरदार लॉबींग, चर्चा व बैठकींचा सिलसिलाही सुरूच होता. दोघांची नावे निश्चित झाल्याची चर्चा होती. मात्र पक्षाकडून नेमकी कुणाला संधी दिली जाणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे तर पक्षांतर्गत एकजूट राखणे व संभाव्य फुट टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून भाजपकडून बैठकीनंतर आपल्या नगरसेवकांना सहलीवर नेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT