पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या तापाच्या साथीचे मुख्य कारण अखेर स्पष्ट झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रयोगशाळा अहवाल समाधानकारक आला असला, तरी ग्रामपंचायतीच्या पाठीमागील बाजूला असलेली मुख्य पाईपलाईन फुटल्याने त्यातून दूषित पाणी पाणीपुरवठ्यात मिसळल्याचे निष्पन्न झाले आहे. याच कारणामुळे गावात तापाची साथ पसरल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध तर्क-वितर्कांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
सुरुवातीला सुमारे ५२ असलेली रुग्णसंख्या आता १२४ वर पोहोचली असून, आज आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे. गावात आतापर्यंत तापाचे एकूण १७६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १६ जणांना टायफॉईडची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्यामुळे रुग्णवाढीचा वेग काहीसा मंदावला असला, तरी साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. सध्या स्थानिक आरोग्य उपकेंद्र तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार विनय कोरे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सारिका नांदेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महंमद देशमुख, पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली मांडकर आणि पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील यांनी आज कुंभारवाडी गावाला भेट दिली. त्यांनी गावात सुरू असलेल्या विशेष आरोग्य शिबिराला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. तसेच, पाईपलाईन फुटल्यामुळे दूषित पाणी नेमके कुठे मिसळले याची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य विभागाला आवश्यक उपाययोजना व सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी गावात विशेष वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाची पथके दररोज घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करत आहेत. दूषित पाण्यामुळेच ही साथ पसरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने संबंधित पाणीपुरवठा बंद केला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती सुरू केली आहे. गावाला सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असून, विहिरीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण करून पाण्याची गुणवत्ता तपासल्यानंतरच नागरिकांना ते पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सरपंच संपदा वरुटे यांनी दिली.