नागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे आणि रस्त्यांची दुरवस्था आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठू लागली आहे. मुलांना शाळेत सोडून घरी परतत असताना सेवा रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दिलीप दत्ता पोवार (वय 47, रा. नागाव फाटा, ता. हातकणंगले) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 10च्या सुमारास नागाव फाटा येथील बँक ऑफ बडोदासमोर घडली.
दिलीप पोवार सोमवारी सकाळी आपल्या मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील आदर्श विद्यालयात सोडून दुचाकीवरून घरी परतत होते. सेवा रस्त्यावरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी त्यात आदळली. या धक्क्याने ते रस्त्यावर जोरात फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता वळविला आहे. या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अशा महामार्गावरील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दिलीप पोवार यांना जीव गमवावा लागला.