कोल्हापूर : भरधाव मोटारीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला; तर एकजण गंभीर जखमी झाला. संदीप शिवाजी पोवार (32, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमी शैलेश शिवकुमार कदम (रा. राजघाट रोड, शिवाजी पेठ) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्णय पोवार कुटुंबीयांनी घेतला.
दरम्यान, अपघातप्रकरणी मोटार चालविणार्या अल्पवयीन मुलासह श्रीकांत वसंतराव जाधव (48, रा. शिवाजी पेठ) यांच्यावर राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. साकोली कॉर्नर - रंकाळा रोडकडे जाणार्या तवटे वखार रोडवर हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि. 23) रात्री उशिरा ही घटना घडली होती. जखमी पोवार व कदम यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला इजा झाल्याने संदीपची प्रकृती चिंताजनक बनली होती. उपचार सुरू असतानाच त्याचा बुधवारी मृत्यू झाला. मोटार चालकाविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.