चंदगड : चंदगड तालुक्यात चोरांच्या टोळीचा धुमाकूळ सुरूच आहे. या दरम्यान श्रीपादवाडी येथील प्रसिद्ध दत्तात्रय मंदिरासह हेरे येथील रवळनाथ मंदिर चोरट्यांनी फोडले. या दोन्ही मंदिरांतून सुमारे चार किलो चांदीचे दागिने, मूर्ती लंपास केल्या. रविवारी घटनास्थळी कोल्हापूर येथील श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब, ठसेतज्ज्ञ पथक पाचारण करून तपास गतिमान केला आहे.
चंदगड शहरापासून सहा ते आठ किमी अंतरावर श्रीपादवाडी येथे प्रसिद्ध दत्तात्रय मंदिर आहे, तर चंदगड ते पारगड या रस्त्यावर सहा कि.मी. अंतरावर हेरे येथे रवळनाथ मंदिर आहे. शनिवारी रात्री बारानंतर हेरे परिसरातील ४० हून अधिक गावांचा वीजपुरवठा ठप्प होता. त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. ही संधी साधून चोरट्याने श्रीपादवाडी मंदिराच्या बाहेरील मोठ्या दरवाजाचे कुलूप न तोडता बाजूने सिमेंटच्या जिन्यावरून मंदिराच्या माडीवर प्रवेश केला. यानंतर खांबाला दोरी बांधून ते खालच्या मजल्यात उतरले. यानंतर देवाऱ्यातील पादुकांचे तीन जोड व नागदेवतेच्या दोन मूर्ती लंपास केल्या. तसेच दत्तांच्या पालखीमध्ये ठेवण्यात येणारी चांदीची फ्रेम व त्यात असणारी दत्तांची चांदीची मूर्ती चोरीला गेली. तीन पादुका 300 ग्रॅम, चांदीची फ्रेम व मूर्ती 300 ग्रॅम व दोन नागाच्या मूर्ती 300 ग्रॅम असा सुमारे एक किलो वजनाचे दागिने चोरीला गेले. या ठिकाणची सीसीटीव्हीची तोडफोड करण्यात आली आहे. याबाबतची वर्दी मंदिराचे पुजारी प्रसाद कुलकर्णी यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.
हेरे येथे गावाच्या मध्यभागी रवळनाथ मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर काही फुटांवर निवासस्थाने आहेत, तरीही येथे चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचा कुलूपही तोडले. यावेळी रवळनाथ मूर्तीला सव्वा दोन किलो चांदीची सोन्याची प्रभावळ होती. त्याशिवाय रवळनाथ देवाच्या गळ्यामध्ये 70 ग्रॅम वजनाचा चांदीचा श्रीमंत हार होता. या दोन्ही वस्तू सुमारे अडीच किलो चांदीच्या आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे तसेच कोल्हापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.