पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथे फायनान्स कंपनीचे थकीत हप्ते वसूल करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यांना जमावाने केलेल्या मारहाणीत दोन कर्मचारी जखमी झाले. याबाबत पाच जणांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री हा प्रकार घडला.
प्रतीक संजय कांबळे व यश संदीप हावळ अशी जखमींची नावे असून याप्रकरणी बशीर मकानदार, सलमान मकानदार, सोन्या ऊर्फ सचिन चव्हाण, प्रतीक चव्हाण, बंट्या ऊर्फ संकेत चव्हाण (सर्व रा. सावर्डे) अशा पाच तरुणावर गुन्हा दाखल झाला.
प्रतीक कांबळे व यश हावळ (रा. पेठवडगाव) हे दोघे बजाज फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतात. शनिवारी हे दोघे सावर्डे येथे रफिक कवठेकर यांच्या घरी थकीत हप्ते मागण्यासाठी गेले. पण यावेळी घरी कवठेकर नव्हते. त्या ठिकाणी घर मालक बशीर मकानदार व त्यांचा मुलगा सलमान यांनी, तुम्ही येथे कसे काय आला म्हणून संदीप हावळ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादामुळे त्या ठिकाणी जमाव जमला.
या जमावातील सोन्या ऊर्फ सचिन चव्हाण, प्रतीक चव्हाण यांनी यश हावळला पकडले व संकेत चव्हाण यांनी काठीने मारहाण केली. याप्रकरणी प्रतीक संजय कांबळे (वय 23, रा. विद्या कॉलनी, पेठवडगाव) यांनी फिर्याद दिल्यानुसार रात्री उशिरा वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर करीत आहेत.