हुपरी : इंगळी रस्त्यावरील जनावरांच्या गोठ्यावर बैल धुताना विद्युत मोटरचा शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. धीरज सहदेव नाईक (वय 28, रा. विठ्ठल चौक हुपरी, मूळ रा. भोज, ता. निपाणी) व भगवान खंडू सोनवणे (65, रा. गणेश माळ, हुपरी) अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सुरू असणारा नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.
खेमलापुरे यांचा भाचा धीरज नाईक विद्युत मोटारीला पाईप लावून सायंकाळी बैल धूत होता. यावेळी त्याला मोटारीच्या तारेचा जोरदार धक्का लागून तो जागेवरच कोसळला. ही घटना पाहून तेथेच काम करीत असलेले भगवान सोनवणे यांनी धीरजला उठविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि तेही जागेवरच कोसळले. डॉ. पाटील यांनी स्वतः दोघांना आरोग्य केंद्रात आणले. तेथील डॉक्टरांनी दोघांचीही तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दीड वर्षाचा सुखी संसार अर्धवट सोडून धीरजची एक्झिट
या घटनेत मृत्युमुखी पडलेला धीरज नाईक हा उद्योजक धनंजय खेमलापुरे यांचा भाचा होता. त्याचे मूळ गाव भोज (ता. निपाणी) असून, मामांच्या कामकाजात मदत करण्यासाठी तो काही वर्षांपासून येथे राहत होता. स्वभावाने अत्यंत मितभाषी व सर्वांशी मिळून मिसळून वागणार्या धीरजचे लग्न गंगानगरमधील अशोक हांडे यांच्या मुलीशी दीड वर्षापूर्वी झाले. केवळ दीड वर्षाचा सुखी संसार अर्धवट सोडून कुणाच्याही ध्यानीमनी नसताना धीरजला दुर्दैवाने एक्झिट घ्यावी लागली.