कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह सीमाभागात रेकी करून चेनस्नॅचिंग, महागड्या दुचाकींची चोरी करणार्या कर्नाटकातील दोघा सख्ख्या भावांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. अशरफअली शेरअली नगारजी (19), सैफअली शेरअली नगारजी (23, रा. निपाणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी 12 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरीचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.
चोरीच्या 5 महागड्या दुचाकी व दोन लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. नगारजी बंधूंविरुद्ध कर्नाटकात खून, खुनाच्या प्रयत्नांसह गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे.
महिलांचे दागिने लंपास
कर्नाटक पोलिसांनी हद्दपार केल्यानंतर दोघांनी सदरबाजार, विचारे माळ परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्य केले. ते काही स्थानिक गुंड, चोरट्यांच्या संपर्कात होते. दोन साथीदारांच्या मदतीने शहरात दुचाकी व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार ते करत होते. यानंतर त्यांनी पुन्हा कर्नाटक गाठले.
शाहूपुरी पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. कर्नाटक पोलिसांनी हद्दपार केल्याने ते कोलार व चामराजनगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात हजेरीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सिंदकर, उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, संदीप जाधव यांच्यासह पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून दुचाकी, चार मंगळसूत्र, बोरमाळ, मोहनमाळ, सोन्याचा हार असा 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.