राजू हुलागटी , गौंडपा शिंदे  
कोल्हापूर

जोतिबा डोंगर पायथ्याचा खून प्रेमाच्या त्रिकोणातून

तीन दिवसांत उलगडा : दोघे ताब्यात, मृत व संशयित बेळगावचे

पुढारी वृत्तसेवा

कोडोली : जोतिबा डोंगराच्या पायथ्याला झालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. आप्पासो शंकर बोरगावे (45, रा. मोळे, ता कागवाड, जि बेळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौंडपा आनंद शिंदे (33, रा. कात्रज, ता. कागवाड, जि. बेळगाव) व राजू भीमाप्पा हुलागटी (41, रा. देसाईवाडी, ता. अथणी, जि. बेळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी (दि. 19) या खुनाबाबत कोडोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. जिल्ह्यातील 120 ते 130 सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची पाहणी केली असता पोलिसांना अनोळखी पुरुषाचा मृतदेह एका ओमनी कारमधून जोतिबा डोंगरावर आणल्याचे आढळले. ही कार राजू हुलागटी (अथणी, जि. बेळगाव) याच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिस पथक अथणी येथे गेले. कारचा मालक राजू भीमाप्पा हुलागटी (41, रा. देसाईवाडी, ता. अथणी. जि. बेळगाव) याला कार (केए 22 एम 6356) सह ताब्यात घेतले. हुलागटी याने पोलिस चौकशीत आप्पासो शंकर बोरगावे असे मृताचे नाव असल्याचे सांगितले. त्याचा भाऊ महावीर बोरगावे याचा 8 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या पत्नीशी आप्पासो याचेे अनैतिक संबंध तयार झाले होते. याच काळात मृताच्या भावजयचे या गुन्ह्यातील मुख्य संशयित गौडप्पा आनंदा शिंदे याच्याशीही प्रेमसंबंध जुळले होते.

याची माहिती होताच आप्पासो हा भावजयला वारंवार मारहाण करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे आप्पासो याच्या भावजयने गौडप्पा शिंदे यास फोन करून आप्पासो बोरगावे याचा बंदोबस्त करा, असे सांगितले. त्यानंतर गौडप्पा शिंदे व राजू हुलागटी या दोघांनी आप्पासो बोरगावे याला जेवायला जायचे, असे सांगून 18 एप्रिल रोजी रात्री उगार येथे नेले. तेथे त्याला दारू पाजली. दारूच्या नशेतच त्याला कारमधून 19 रोजी रात्री दोनच्या सुमारास यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर आणून त्याचे हात-पाय बांधून त्याला अमानुषपणे मारहाण केली. नंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

गौडप्पा आनंद शिंदे (33) याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले असता त्याने आप्पासो बोरगावे याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. याबाबत दोन्ही संशयितांना गुन्ह्यात वापरलेल्या कारसह पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने, राम कोळी आदींच्या पथकाने तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT