कोल्हापूर : भोगावती (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी करवीर पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली. विजय लक्ष्मण कोळसकर ( वय ३९, रा. मडिलगे खुर्द, ता. करवीर), ओंकार गोरखनाथ कराळे (३०, सडोली खालसा, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
संशयित विजय व ओंकार हे दोघे मित्र असून, त्यांनी कर्नाटक (बेळगाव) येथून सोनोग्राफी मशिन खरेदी केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. खरेदी केलेले सोनोग्राफी मशिन मुख्य संशयित महेश पाटीलसह टोळीला पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी टोळीशी संबंधित निष्पन्न होणाऱ्या एजंटांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.