इचलकरंजी : दारू पिण्याच्या वादातून विकी सुरेश अग्रवाल (वय 25) या महापालिकेच्या सफाई कर्मचार्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गुरुवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार आलोक सुरेश देवर्षी (रा. शांतीनगर), रिमोन धनंजय आवळे (रा. इचलकरंजी) या दोघा संशयितांना अटक केली. या प्रकरणातील तिसर्या अल्पवयीन संशयिताची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याची माहिती पो.नि. महेश चव्हाण यांनी दिली.
शांतीनगर ते इंदिरानगर मार्गावर महापालिकेच्या दुकान गाळ्याच्या जवळ विकी अग्रवाल याचा मृतदेह आढळून आला होता. दारू पित बसल्यानंतर झालेल्या वादातून तिघांनी डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याची फिर्याद विवेक अग्रवाल यांनी दिली होती. आवळे, देवर्षी व त्यांचा अल्पवयीन साथीदार या तिघांना ताब्यात घेतले होते. देवर्षी व आवळे या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.