Ahilyanagar Firing Case | अहिल्यानगर गोळीबारातील दोघांना अटक 
कोल्हापूर

Ahilyanagar Firing Case | अहिल्यानगर गोळीबारातील दोघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषणची गोकुळ शिरगाव येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून अहिल्यानगर येथे एकावर गोळीबार करून पसार झालेल्या दोघा सराईत गुंडांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून अटक केले. १० ऑक्टोबर रोजी पहाटे नेवासा येथील साईनाथनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. अभिषेक ऊर्फ अभी कल्याण चव्हाण (वय २४), हरण कल्याण चव्हाण (२२ दोघेही रा. देवगड फाटा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत.

गोळीबारातील दोन संशयित गोकुळ शिरगाव येथील माधवनगर परिसरात लपल्याची माहिती पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. यानुसार पथकाने सोमवारी (दि. १६) पहाटे सापळा रचून अभिषेक चव्हाण आणि हरण चव्हाण यांना ताब्यात घेतले. दुपारी त्यांना अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सत्यजित तानुगडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, राजू येडगे यांनी ही कारवाई केली.

हात तोडला... पाठीवर गोळीबार

१० ऑक्टोबर रोजी पहाटे अहिल्यानगर येथे रमेश भोसले याच्यावर पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून हल्ला केला होता. कल्याण चव्हाण याच्यासह आठ ते दहाजणांनी भोसलेवर गोळीबार करून त्याचा हात तलवारीने वार करून तोडला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी आठजणांना यापूर्वीच अटक केली आहे. अभिषेक याच्‍यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असून, हरणवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

नाव बदलून वावर

अभिषेक चव्हाण, हरण चव्हाण हे दोघे महिनाभरापासून गोकुळ शिरगाव येथील माधवनगर परिसरात राहत होते. खोट्या नावाचा आधार घेऊन ओळख लपवून दोघे वावरत असल्याची माहिती तपासात समोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT